पुसद तालुक्यातील आय.टी.आय. हर्षी येथे प्रवेश प्रक्रिया सुरू - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, June 18, 2026

पुसद तालुक्यातील आय.टी.आय. हर्षी येथे प्रवेश प्रक्रिया सुरू



३८ प्रशिक्षणार्थ्यांचे ऑन जॉब ट्रेनिंग यशस्वी

अमरावती, दि.१८ : महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत कार्यरत असलेल्या क्रांतीकारी लागुड बिगुड शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आदिवासी आश्रमशाळा) हर्षी, ता. पुसद येथे शैक्षणिक सत्र ऑगस्ट २०२६ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. अमरावती विभागातील इच्छुक उमेदवारांनी आयटीआय प्रवेशासाठी आपले अर्ज सादर करावे, असे आवाहन आयटीआयचे प्रकल्प अधिकारी ए. एस. काळे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

या संस्थेत १० वी उत्तीर्ण आणि नापास असलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी फिटर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी २० जागा असून अभ्यासक्रमाचा २ वर्षे कालावधी आहे. यांत्रिक मोटार गाडी अभ्यासक्रम (२४ जागा, २ वर्षे), तारतंत्री अभ्यासक्रम (२० जागा, २ वर्षे) आणि सुईंग टेक्नॉलॉजी (२० जागा, १ वर्ष) हे रोजगाराभिमुख अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. दि. २१ मेपासून विभागाच्या www.admission.dvet.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. अर्ज भरल्यानंतर प्रवेश शुल्क जमा करून संस्थेत जाऊन आपला अर्ज निश्चित (Confirm) करणे आवश्यक आहे. या संस्थेतील प्रवेशित विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता प्रत्यक्ष कामाचा अनुभव दिला जातो. विशेषत: आदिवासी विद्यार्थ्यांना या संस्थेत प्रवेशाकरिता प्राधान्य दिले जाणार.

नुकतेच येथील फिटर अभ्यासक्रमाच्या १४ विद्यार्थी, एम.एम.व्ही. अभ्यासक्रमाच्या १४ विद्यार्थी आणि तारतंत्री व्यवसायाच्या १० विद्यार्थ्यांनी अनुक्रमे पियागो प्रायव्हेट लिमिटेड (बारामती) आणि कूलटेक प्रायव्हेट लिमिटेड (छत्रपती संभाजीनगर) यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये ३० दिवसांचे 'ऑन जॉब ट्रेनिंग' यशस्वीरित्या पूर्ण केले असून त्यांनी कायमची नोकरी पत्करली आहे. आय.टी.आय. उत्तीर्ण प्रशिक्षणार्थींना शासकीय व निमशासकीय कार्यालये, रेल्वे, मिलिटरी, एस.टी. महामंडळ आणि विद्युत महामंडळात नोकरीच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत, तसेच स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी शासनाच्या विविध कर्ज योजनांचा लाभ आणि उच्च शिक्षणाची सोयही उपलब्ध आहे.

याशिवाय संस्थेत प्रवेश घेणाऱ्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांना दरमहा ५०० रुपये विद्यावेतन आणि प्रवासासाठी एस.टी. पास सवलत दिली जाते. प्रवेशासाठी उमेदवारांकडे अपडेटेड आधार कार्ड, १० वीची गुणपत्रिका, मूळ शाळा सोडल्याचा दाखला, जात प्रमाणपत्र, नॉन-क्रिमीलेयर (लागू असल्यास), अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला आणि २ पासपोर्ट फोटो असणे आवश्यक आहे. निवड झालेल्या उमेदवारांनी वेळापत्रकानुसार सर्व मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहून आपला प्रवेश निश्चित करावा. अधिक माहितीसाठी आय.टी.आय. हर्षी येथे प्रत्यक्ष भेट द्यावी किंवा संस्थेचे शिक्षक श्री. कांबळे (9673060328), श्री. उमाळे (9767763073), श्री. ढोंगे (8888713104) व श्री. बकाडे (9370098090) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी ए. एस. काळे यांनी केले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages