दि. १ जून :-पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर (३१ मे १७२५ – १३ ऑगस्ट १७९५) या भारताच्या इतिहासातील एक अद्वितीय, दानशूर आणि न्यायप्रिय राज्यकर्ती होत्या. मराठा साम्राज्यातील होळकर घराण्याची सूत्रे यशस्वीपणे सांभाळत त्यांनी 'लोकमाता' म्हणून संपूर्ण भारतवर्षात अढळ स्थान मिळवले.अहिल्याबाईंचा जन्म महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी या गावी झाला. त्यांचे वडील माणकोजी शिंदे हे गावचे पाटील होते. लहानपणापासूनच हुशार आणि धाडसी असलेल्या अहिल्याबाईंचा विवाह १७३३ मध्ये मल्हारराव होळकर यांचे सुपुत्र खंडेराव होळकर यांच्याशी झाला.वयाच्या अवघ्या २९ व्या वर्षी त्यांचे पती खंडेराव यांना कुंभेरीच्या युद्धात वीरमरण आले. त्यानंतर अहिल्याबाई सती जाण्याच्या तयारीत असताना, सासरे मल्हारराव होळकर यांनी त्यांना रोखले आणि प्रजाहितेसाठी राज्य सांभाळण्याची विनंती केली.सासऱ्यांच्या निधनानंतर अहिल्याबाईंनी माळवा प्रांताची धुरा अत्यंत समर्थपणे सांभाळली. त्यांनी १७७२ मध्ये आपली राजधानी महेश्वर येथे हलवली.अहिल्याबाईंनी आपल्या २९ वर्षांच्या कार्यकाळात शेती, उद्योग, व्यापार आणि रस्ते विकासाला चालना दिली. त्यांनी महेश्वर येथे सुंदर घाट बांधले आणि वस्त्रोद्योगाला प्रोत्साहन दिले. अहिल्याबाईंनी देशभर मंदिरे, धर्मशाळा, विहिरी आणि पांथस्थांसाठी पाणपोया उभारल्या. काशी, गया, सोमनाथ, उज्जैन, अयोध्या यांसारख्या प्रमुख तीर्थक्षेत्रांचा त्यांनी मोठ्या प्रमाणावर जीर्णोद्धार केला. त्यांच्या काळात स्त्रियांना स्वावलंबी बनवले गेले आणि विधवांच्या पुनर्विवाहाला प्रोत्साहन दिले.
एका सामान्य घरात जन्माला आलेल्या अहिल्येला ‘लोकमाते’ची पदवी दिली ती प्रजेने ! अहिल्या, अहिल्याबाई, अहिल्यादेवी, मातोश्री अहिल्यादेवी, लोकमाता हा त्यांचा जीवनाचा प्रवास आश्चर्यकारक होता. स्त्री असल्यामुळे त्यांच्यावर स्त्रीत्वाची बंधने होती. बंधने असूनही त्यांनी स्वतःचे जीवन कर्तव्यपूर्तीने यशस्वी केले. अधिकार संपन्न आणि श्रीमंत असूनही निर्मोही, त्यागशील, व्रतस्थ रहाणे, हे दिव्य अहिल्याबाईंनी जन्मभर केले. सती न जाताही त्या सती ठरल्या, ते त्यांच्या निराभिमानी वागण्यामुळेच. त्यांच्यासमोर अनेक प्रलोभने होती. मोह होते. तिजोरी पैशांनी भरलेली होती. अनेक राज्ये त्यांच्यासमोर होती. आजूबाजूच्या राज्यात वाढते कर लादून प्रजेला पिळणारे राजे त्या पहात होत्या; पण तरीही त्या कधीही प्रलोभनांमध्ये अडकल्या नाहीत. उलट त्यांचे वागणे इतके चोख की, त्यांचा आदर्श इतरांनी पुढे ठेवावा. त्यांची स्वतःच्या तत्त्वांवर अढळ अशी निष्ठा होती.
स्वतःच्या तेजस्वी कर्मठ आणि व्रतस्थ जीवनामुळे त्यांनी अक्षय्य कीर्ती प्राप्त केली. त्यांच्या अंगी इतके सद्गुण होते की, तितके सर्वच्या सर्व एकाच व्यक्तीच्या ठायी असणे, हा ईश्वराने केलेला चमत्कार होता. नाही तर जिथे धर्मपरायणता आणि परमार्थभाव असतो, तिथे राजकारणी मुत्सद्देगिरीचा अंशही नसतो अन् जिथे राजकारणी मुत्सेद्दीपण असते, तिथे धार्मिक सहिष्णुता आढळत नाही. त्याचप्रमाणे जिथे धैर्य, शौर्य पराक्रम असतो, तिथे नम्रता किंवा परदु:खकारकता नसते. शक्ती आणि वैभवाला चरित्रसंपन्नतेची साथ लाभत नाही, हे जगात आपल्याला सर्वत्र दिसते.
अहिल्याबाईंनी बांधलेल्या अनेक विहिरी, धर्मशाळा, पूल, रस्ते, घाट आणि देवळे या रूपांत त्यांनी केलेले कार्य आजही सुस्थितीत बघायला मिळते. कोलकाता ते वाराणसी रस्ता सिद्ध करून सौराष्ट्रांत सोमनाथाचे, गयेला विष्णूचे आणि काशीला विश्वनाथाचे, नेपाळ येथील पशुपतीनाथ अशी विविध देवालये त्यांच्या धार्मिक वृत्तीची आणि दातृत्वाची आजही साक्ष देत आहेत. अहिल्याबाईंनी त्यांच्या जीवनकाळात केलेल्या पुण्यकर्मांमुळेच त्या ‘पुण्यश्लोक’ झाल्या. इंदूर संस्थानचा कारभार त्यांनी अत्यंत कर्तबगारीने जवळजवळ ३० वर्षे सांभाळला.
जेवढ्या धार्मिक, तेवढ्याच मुत्सद्दी अशा अहिल्याबाईंचे जीवन भारतीय स्त्रीधर्माचे एक ज्वलंत उदाहरण आहे.मल्हाररावानंतर इंदूर संस्थानची आधारवेल आणि स्त्री पराक्रमाचे एक सुवर्णपान मराठी इतिहासात अहिल्याबाईंच्या पराक्रमाने जुळले.आज त्यांची जयंती,त्यांना कोटी-कोटी नमन..!
सौ. कंचन मुरके
अध्यक्ष
महिला मंच
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ (महाराष्ट्र प्रदेश)