आर्चरी वर्ल्ड कपमध्ये 'सुवर्ण' भेद करणाऱ्या कुमकुम मोहोडचा जिल्हाधिकाऱ्यांकडून सत्कार - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Tuesday, May 19, 2026

आर्चरी वर्ल्ड कपमध्ये 'सुवर्ण' भेद करणाऱ्या कुमकुम मोहोडचा जिल्हाधिकाऱ्यांकडून सत्कार

 



अमरावती, दि. २०(ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): नुकत्याच शांघाय, चीन येथे पार पडलेल्या 'वर्ल्ड आर्चरी चॅम्पीयनशिप' स्टेज 2 स्पर्धेत अमरावतीची आंतरराष्ट्रीय तिरंदाज कुमकुम मोहोड हिने भारतीय महिला संघाला सुवर्णपदक मिळवून दिले आहे. या यशाबद्दल जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते कुमकुमचा शाल आणि पुस्तक देऊन गौरव करण्यात आला. यावेळी जिल्हा प्रशासनाकडून खेळाडूंना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

जागतिक स्पर्धेत भारत आणि यजमान चीन यांच्यातील अंतिम सामना 4-4 असा बरोबरीने सुटला होता. त्यानंतरच्या 'शूट-ऑफ'मध्ये कुमकुमने अचूक लक्ष्यभेद करीत चीनला पराभूत केले. या कामगिरीने भारतीय महिला संघाने 5 वर्षांनंतर पहिले सांघिक सुवर्णपदक पटकाविले. उपांत्य फेरीतही भारतीय संघाने 10 वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणाऱ्या दक्षिण कोरियाच्या संघाला पराभूत केले. या सुवर्णविजेत्या भारतीय संघात कुमकुम मोहोडसह अंकिता भगत आणि 4 वेळची ऑलिम्पियन दीपिका कुमारी यांचा समावेश होता.

कुमकुम ही गेल्या 9 वर्षांपासून अमरावती जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र, 'खेलो इंडिया' आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या शूटिंग रेंजवर आंतरराष्ट्रीय क्रीडा मार्गदर्शक प्रफुल्ल डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. अत्यंत कमी वयाची असलेली कुमकुम सध्या फॉर्मात असून, तिची आगामी जूनच्या दुसऱ्या आठवड्यात तुर्की येथे होणाऱ्या वर्ल्ड कप स्टेज 03, स्पेन (माद्रिद) येथील वर्ल्ड कप स्टेज 4 आणि सप्टेंबरमध्ये जपान येथे होणाऱ्या आशियाई गेम्ससाठी भारतीय संघात निवड झाली आहे. कुमकुमसोबतच अमरावतीचा यशदीप भोगे याची देखील आशियाई गेम्ससाठी निवड झाली आहे.

कुमकुमच्या यशाचे कौतुक करताना जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी कुमकुमची लहान वयातील ही कामगिरी पाहता, ती 2028 मध्ये लॉस एंजेलिस (अमेरिका) येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत निश्चितच भारताचे प्रतिनिधित्व करेल आणि देशाचे नाव लौकिक वाढवेल, असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, अनिल इंगळे, क्रीडा मार्गदर्शक. प्रफुल्ल डांगे उपस्थित होते.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages