अणुशक्तीनगर येथील प्रस्तावित अल्पसंख्याक मुलींसाठीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या उभारणीला गती द्यावी -उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, May 1, 2026

अणुशक्तीनगर येथील प्रस्तावित अल्पसंख्याक मुलींसाठीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या उभारणीला गती द्यावी -उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार




मुंबई, दि. १ मे  :- शिक्षण, कौशल्य विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून अल्पसंख्याक समाजाचा सर्वांगीण विकास साधण्यास राज्य सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही देत, चेंबूर येथील अणुशक्तीनगर परिसरात अल्पसंख्याक मुलींसाठीच्या प्रस्तावित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या उभारणीच्या कामाला गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा अल्पसंख्याक विकास मंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे अल्पसंख्याक विकास विभागाच्या विविध योजनांचा व जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील, नगरविकास व अल्पसंख्याक विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार सना मलिक-शेख, कौशल्य विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा वर्मा, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, अल्पसंख्याक विकास विभागाचे सचिव योगेश म्हसे, जैन अल्पसंख्याक विकास आर्थिक महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी, उपाध्यक्ष मितेश नाहटा यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या की, अल्पसंख्याक समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक उन्नतीसाठी राज्य सरकार विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करत असून या प्रयत्नांना अधिक गती देण्यात येणार आहे. विशेषतः मुलींच्या उच्च तांत्रिक शिक्षणासाठी दर्जेदार सुविधा निर्माण करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

बैठकीत ‘मार्टी’ संस्थेशी संबंधित विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. संस्थेसाठी स्वतंत्र लेखा उघडणे, कामकाज अधिक सक्षम करण्यासाठी मंजूर पदे तात्काळ भरणे, तसेच तात्पुरत्या स्वरूपात भाडेतत्त्वावर कार्यालय सुरू करण्याबाबत सकारात्मक भूमिका घेण्यात आली.

अल्पसंख्याक समाजातील तरुणांना आधुनिक शिक्षण प्रणालीशी जोडण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवरही विचारविनिमय झाला. कौशल्य विकास, तंत्रज्ञानाधारित शिक्षण आणि रोजगाराभिमुख उपक्रमांद्वारे युवकांना सक्षम करण्यावर सरकारचा विशेष भर राहील, असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी स्पष्ट केले.

जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या कामकाजाला गती देणार

 – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे काम अधिक वेगाने व परिणामकारक करण्यासाठी पूर्णवेळ व्यवस्थापकीय संचालक (एमडी) नेमण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिली. महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सादर केलेल्या प्रस्तावांचे तातडीने परीक्षण करून पुढील कार्यवाहीसाठी सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

महामंडळाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा व मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश देत, जैन समाजाच्या सर्व घटकांच्या सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी ठोस उपाययोजना करण्यावर भर देण्यात आला. जैन तसेच अल्पसंख्याक विकास विभागाच्या विविध मंडळावर प्रलंबित अशासकीय सदस्यांच्या नियुक्तीचा प्रश्न लवकर मार्गी लावण्याची ग्वाही देत, महामंडळाच्या कामासाठी शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages