जिल्हा युवा पुरस्कार जाहीर; आज महाराष्ट्र दिनी होणार मान्यवरांच्या हस्ते गौरव - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, May 1, 2026

जिल्हा युवा पुरस्कार जाहीर; आज महाराष्ट्र दिनी होणार मान्यवरांच्या हस्ते गौरव

 


अमरावती, दि. १ मे  (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जिल्ह्यातील युवक, युवती आणि संस्थांचा गौरव करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणारे सन 2024-25 व 2025-26 चे 'जिल्हा युवा पुरस्कार' जाहीर करण्यात आले आहेत. हे पुरस्कार 1 मे 2026 रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त पोलीस मुख्यालय, अमरावती येथील प्रांगणात आयोजित सोहळ्यात प्रदान करण्यात येणार आहेत. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या शुभहस्ते आणि वरिष्ठ सनदी अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत हा वितरण सोहळा पार पडणार असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी  यांनी कळविले आहे.

सन 2024-25 या वर्षासाठी 'विशेष जिल्हा युवा पुरस्कार' नाळ चित्रपट फेम बालकलाकार श्रीनिवास गणेश पोकळे याला जाहीर झाला आहे. श्रीनिवासने आपल्या अभिनयाने दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळवून जिल्ह्याचा नावलौकिक वाढविला आहे. याच वर्षासाठी युवक गटातून अमर पुरुषोत्तम वानखडे (तिवसा), युवती गटातून कु. जानव्ही राउत (नया वाठोडा) तसेच संस्था गटातून श्री. संताजी बहुउद्देशीय शिक्षण संस्था (गुरुकुंज आश्रम) यांची निवड करण्यात आली आहे. या सर्वांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा प्रचार, व्यसनमुक्ती, रक्तदान आणि आदिवासी विकास क्षेत्रात मोलाचे कार्य केले आहे.

सन 2025-26 या वर्षासाठी युवक गटात समाजप्रबोधनकार वेदांत मुंदाने (अमरावती), युवती गटात कु. पुजा गुंजरकर (ब्राम्हणवाडा थडी) आणि संस्था गटात स्वामी विवेकानंद विचार मंच (अचलपूर) यांना पुरस्कार जाहीर झाले आहेत. वेदांत मुंदाने यांनी कीर्तनाच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य केले आहे, तर पुजा गुंजरकर यांनी स्वसंरक्षण प्रशिक्षण आणि पर्यावरण क्षेत्रात योगदान दिले आहे. अचलपूरच्या विवेकानंद विचार मंचने आरोग्य सेवा आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केले आहे. युवक व युवती पुरस्काराचे स्वरूप स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व 10 हजार रुपये रोख, तर संस्था पुरस्काराचे स्वरूप स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व 50 हजार रुपये रोख असे आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages