अमरावती विभागाची ऐतिहासिक कामगिरी ; महाआवास अभियानात राज्यात व्दितीय क्रमांक - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Tuesday, May 19, 2026

अमरावती विभागाची ऐतिहासिक कामगिरी ; महाआवास अभियानात राज्यात व्दितीय क्रमांक




  महाआवास अभियान 2023-24

अमरावती विभागाने विविध स्तरावरील आठ पुरस्कार पटकाविले

 

यवतमाळच्या लाभार्थ्याला 'देशातील 3 कोटीचे घरकुल' पूर्ण करण्याचा बहुमान

 

विभागीय आयुक्तांकडून कौतुक आणि अपूर्ण कामे पूर्ण करण्याचे आवाहन

 

*

        अमरावती, दि. २० : महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायतराज विभागामार्फत ग्रामीण भागातील बेघर कुटुंबांना हक्काचे घर उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘महाआवास अभियान 2023-24’ मध्ये अमरावती विभागाने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या अभियानात उत्कृष्ट कामगिरी करत अमरावती विभागाने राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. सातारा येथे आयोजित कार्यक्रमात केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते या पुरस्काराचे तत्कालीन विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय, अपर आयुक्त (विकास) शालिनी कडू व उपायुक्त राजीव फडके यांना वितरण करण्यात आले.  

            अमरावती विभागाने विविध स्तरावर तब्बल आठ पुरस्कार पटकाविले असून, 15 मे रोजी, सातारा सैनिक स्कूल येथे आयोजित एका भव्य गौरव सोहळ्यात संबंधित विभाग प्रमुखांना पुरस्कार प्रदान करुन त्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे व प्रधान सचिव एकनाथ डवले यांची प्रमुख उपस्थिती होती. या सोहळ्यात विभागीय आयुक्त (अमरावती विभाग), अपर आयुक्त (विकास), सहाय्यक आयुक्त (विकास), अकोला व अमरावती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, आणि पातुर (जि. अकोला) चे गटविकास अधिकारी यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान करून गौरविण्यात आले.

अमरावती विभागाला मिळालेले विविध स्तरांवरील पुरस्कार पुढीलप्रमाणे :

विभाग स्तरावर राज्य पुरस्कृत आवास योजनेत अमरावती विभागाला राज्यात द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आहे. जिल्हा परिषद स्तरावर अमरावती जिल्हा परिषदेला 'राज्य पुरस्कृत आवास योजनेत' राज्यात द्वितीय क्रमांक मिळाला आहे. अकोला जिल्हा परिषदेला 'प्रधानमंत्री आवास योजनेत' राज्यात तृतीय क्रमांक प्राप्त झाला आहे. पंचायत समिती स्तरावर अकोला जिल्ह्यातील पातूर पंचायत समितीला 'प्रधानमंत्री आवास योजनेत' राज्यात प्रथम क्रमांक मिळाला आहे. ग्रामपंचायत स्तरावर वाईगौळ ग्रामपंचायत (ता. मानोरा, जि. वाशीम) - प्रधानमंत्री आवास योजनेत तृतीय क्रमांक, बेलुरा बु. ग्रामपंचायत (ता. अकोट, जि. अकोला) - 'उत्कृष्ट बहुमजली इमारत' श्रेणीत तृतीय क्रमांक, देपूळ ग्रामपंचायत (ता. जि. वाशीम) - राज्य पुरस्कृत आवास योजनेत तृतीय क्रमांक प्राप्त झाला आहे.

                 यवतमाळच्या लाभार्थ्याला 'देशातील ३ कोटीचे घरकुल' पूर्ण करण्याचा बहुमान

या सोहळ्याचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे, यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील इनापूर येथील लाभार्थी दशरथ सवई-चव्हाण यांनी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत देशातील ३ कोटी क्रमांकाचे घरकुल पूर्ण करण्याचा ऐतिहासिक मान मिळवला. या अभूतपूर्व कामगिरीबद्दल केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चव्हाण व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांना त्यांच्या हक्काच्या घराची चावी प्रदान करून विशेषरित्या सन्मानित करण्यात आले.

                                                             विभागीय आयुक्तांकडून कौतुक आणि आवाहन

या गौरव सोहळ्यास पुरस्कारप्राप्त जिल्ह्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक, गटविकास अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, सरपंच आणि ग्रामसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अमरावती विभागाच्या या दैदिप्यमान यशाबद्दल विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी सर्व यशस्वी अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींचे मनापासून अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच, विभागात अद्याप अपूर्ण असलेली घरकुलांची कामे गतीने आणि गुणवत्तापूर्ण रितीने त्वरित पूर्ण करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages