अमरावती महानगरपालिका आणि MSIDC यांच्यात विविध मोठ्या प्रकल्पांसाठी सामंजस्य करार - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Sunday, March 8, 2026

अमरावती महानगरपालिका आणि MSIDC यांच्यात विविध मोठ्या प्रकल्पांसाठी सामंजस्य करार



दि. ८ अमरावती (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क):

शहराच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी अमरावती महानगरपालिका आणि महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ (MSIDC) यांच्यात महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील विविध मोठ्या व महत्त्वाच्या प्रकल्पांच्या नियोजनबद्ध अंमलबजावणीसाठी हा करार करण्यात आला असून, यामुळे शहराच्या विकासाला नवी दिशा मिळणार आहे.

हा सामंजस्य करार राज्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. ब्रिजेश दिक्षीत आणि अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी करारावर स्वाक्षऱ्या करून दोन्ही संस्थांमधील सहकार्याची औपचारिक सुरुवात केली. कार्यक्रमाला विविध विभागांचे अधिकारी तसेच मान्यवर उपस्थित होते.

या कराराच्या माध्यमातून अमरावती शहरातील अनेक महत्त्वाचे प्रकल्प नियोजनबद्ध आणि आधुनिक पद्धतीने राबविण्यात येणार आहेत. त्यामध्ये अमरावती महानगरपालिकेची नवीन प्रशासकीय इमारत उभारणे, नेहरू मैदान परिसरात अत्याधुनिक टाऊन हॉलची निर्मिती करणे तसेच झोन क्रमांक १ ते ५ मधील कार्यालयीन इमारतींची उभारणी व सुविधा उभारणे या प्रकल्पांचा समावेश आहे.

अमरावती महानगरपालिकेची नवीन प्रशासकीय इमारत उभारण्यात आल्यास महानगरपालिकेच्या विविध विभागांचे कामकाज एका आधुनिक आणि सुसज्ज इमारतीतून होणार आहे. त्यामुळे प्रशासकीय कामकाज अधिक कार्यक्षम, वेगवान आणि नागरिकाभिमुख होण्यास मदत होणार आहे. तसेच नागरिकांना विविध विभागांची सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार असल्यामुळे त्यांच्या वेळेची व श्रमांची बचत होणार आहे.

नेहरू मैदान परिसरात प्रस्तावित टाऊन हॉल हा शहरासाठी एक महत्त्वाचा सांस्कृतिक व सार्वजनिक उपक्रमांचा केंद्रबिंदू ठरणार आहे. या टाऊन हॉलमध्ये विविध शासकीय कार्यक्रम, सांस्कृतिक उपक्रम, बैठका, परिषद तसेच सामाजिक कार्यक्रम आयोजित करता येणार असून शहरातील नागरिकांना एक सुसज्ज सार्वजनिक सुविधा उपलब्ध होणार आहे.

तसेच महानगरपालिकेच्या झोन क्रमांक १ ते ५ मधील कार्यालयीन इमारतींच्या उभारणीमुळे विभागनिहाय प्रशासन अधिक मजबूत होणार आहे. नागरिकांना त्यांच्या परिसरातच विविध शासकीय सेवा व सुविधा मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे महानगरपालिकेचे प्रशासन अधिक प्रभावी आणि लोकाभिमुख होण्यास हातभार लागणार आहे.

या प्रकल्पांच्या अंमलबजावणीमुळे अमरावती शहराच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठी भर पडणार असून शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे. शहराचे नियोजनबद्ध व आधुनिक पद्धतीने विकास साधण्यासाठी महानगरपालिका व MSIDC यांच्यातील हे सहकार्य महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages