Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

जागतिक महिला दिनानिमित्त अमरावतीत महिला मेळावा, सांस्कृतिक कार्यक्रम व विविध उपक्रम उत्साहात संपन्न










एमएसआयडीसी
महानगरपालिका करारनामा; कर्तृत्ववान महिलांचा गौरव, बचत गटांच्या स्टॉल्सना उत्स्फूर्त प्रतिसाद

दि. ८ अमरावती (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) :

जागतिक महिला दिनानिमित्त अमरावती महानगरपालिकेच्या महिला व बाल विकास विभाग, राष्ट्रीय शहरी आजीविका अभियान (NULM) विभाग तसेच शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महिला मेळावा, कर्तृत्ववान महिलांचा सत्कार, सांस्कृतिक कार्यक्रम व विविध उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. शनिवारी (दि. ७ मार्च) संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन, मोर्शी रोड, अमरावती येथे झालेल्या या कार्यक्रमाला शहरातील महिला बचत गटांच्या सदस्यांसह महिला अधिकारी-कर्मचारी, शिक्षिका व नागरिकांचा मोठ्या संख्येने सहभाग लाभला.

कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे महसूल मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमरावती महानगरपालिकेचे महापौर श्रीचंद तेजवाणी होते.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार संजय खोडके, आमदार सौ. सुलभा खोडके, आमदार रवि राणा, उपमहापौर सचिन भेंडे, स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, पक्षनेता चेतन गावंडे, गटनेता नाना आमले तसेच नगरसेवक-नगरसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील प्रस्‍तावित विविध मोठ्या प्रकल्‍पाकरीता महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ (MSIDC) चे मॅनेजिंग डायरेक्‍टर डॉ. ब्रिजेश दिक्षीत व महानगरपालिका आयुक्‍त सौम्‍या शर्मा चांडक यांच्‍यात पालकमंत्री मा.ना.श्री. चंद्रशेखर बावनकुळे व मान्‍यवरांच्‍या उपस्थितीत सामंजस्‍य करार करण्यात आला.  

पालकमंत्री मा. ना. श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, आज जगभरात जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात असून विविध स्तरांवर महिला सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण प्रयत्न सुरू आहेत. महिलांनी शिक्षण, उद्योग, प्रशासन आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून समाजाच्या प्रगतीत मोलाचे योगदान दिले आहे.

अमरावती शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध असून स्वच्छ अमरावती ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. महानगरपालिकेतील कायमस्वरूपी स्वच्छता कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावत दररोज किमान आठ तास काम केल्यास शहर अधिक स्वच्छ व सुंदर होऊ शकते, असेही त्यांनी नमूद केले.

महानगरपालिकेच्या प्रशासकीय कामकाजासाठी नवीन प्रशासकीय इमारतीसाठी योग्य जागा उपलब्ध करून देण्यात येईल, तसेच शहरातील झोन कार्यालयांची सुविधा अधिक सक्षम व सुस्थितीत करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

अमरावती शहरातील धार्मिक व सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी अंबादेवीएकविरा देवी मंदिर परिसर विकास प्रकल्प त्वरित राबविण्यात येणार असून शहरातील सुरक्षाव्यवस्था मजबूत करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राज्य शासनाच्या लखपती दीदी योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असून अमरावतीमध्येही ही योजना यशस्वी ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले. या अंतर्गत १५०० महिला बचत गटांना प्रत्येकी एक लाख रुपयांचे अर्थसाहाय्य देण्यात येणार असून त्यापैकी सुमारे ५०० बचत गट अमरावती शहरातील असतील, असेही त्यांनी सांगितले.

अमरावतीच्या नागरिकांना अपेक्षित असलेला विकास निश्चितपणे साध्य करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असून शहराच्या पायाभूत सुविधा, स्वच्छता, सुरक्षा आणि महिला सक्षमीकरण या सर्व क्षेत्रांत ठोस पावले उचलली जातील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

यावेळी खासदार डॉ.अनिल बोंडे, आमदार सुलभाताई खोडके, आमदार रविभाऊ राणा यांनी आपले मनोगत व्‍यक्‍त केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपायुक्त नरेंद्र वानखडे यांनी प्रास्ताविकातून महिला सक्षमीकरणासाठी महानगरपालिका विविध उपक्रम राबवत असल्याची माहिती दिली. महिला बचत गटांना प्रोत्साहन देणे, त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे तसेच महिलांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देणे या उद्देशाने महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच महिलांच्या आरोग्याबाबत जागरूकता वाढविण्यासाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी महिलांचे सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक सक्षमीकरण ही काळाची गरज असल्याचे सांगितले. महिलांनी विविध क्षेत्रांमध्ये पुढाकार घेत समाजाच्या प्रगतीत मोठे योगदान दिले असून शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून महिलांना अधिक सक्षम करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.

आधुनिक तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापराच्या पार्श्वभूमीवर महिलांमध्ये डिजिटल सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी सायबर सुरक्षा व डिजिटल साक्षरता विषयावर विशेष सादरीकरण करण्यात आले. ऑनलाईन फसवणूक टाळण्याचे उपाय, सुरक्षित डिजिटल व्यवहार, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर व सायबर गुन्ह्यांपासून बचाव याबाबत उपस्थितांना माहिती देण्यात आली.

महिला मेळाव्यात शहरातील विविध महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्रीसाठी स्टॉल्स उभारण्यात आले होते. घरगुती पदार्थ, हस्तकला वस्तू, कपडे, सजावटीच्या वस्तू व दैनंदिन वापराच्या वस्तूंना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या माध्यमातून महिलांना त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध होऊन आर्थिक स्वावलंबनाकडे वाटचाल करण्याची संधी मिळत असल्याचे बचत गटांच्या सदस्यांनी सांगितले.

महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने अमरावती महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे विशेष आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात महिलांची सामान्य आरोग्य तपासणी करण्यात आली तसेच आवश्यक वैद्यकीय सल्लाही देण्यात आला. विशेषतः मॅमोग्राफी तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. अनेक महिलांनी या सुविधेचा लाभ घेतला.

महिलांना विविध शासकीय योजनांची माहिती मिळावी यासाठी कार्यक्रमस्थळी विविध विभागांचे माहिती स्टॉल्स उभारण्यात आले होते. जिल्हा ग्रामोद्योग खादी विभाग, जिल्हा उद्योग केंद्र, कामगार विभाग, महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळ, वसंतराव नाईक महामंडळ, चर्मकार महामंडळ, अण्णाभाऊ देशमुख ओबीसी महामंडळ, समाज कल्याण विभाग, पर्यटन विभाग, जिल्हा कौशल्य रोजगार विभाग, प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना तसेच अमरावती महानगरपालिकेचा समाज विकास विभाग यांच्या स्टॉल्सच्या माध्यमातून महिलांना विविध योजनांची माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात आले.

या महिला मेळाव्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान. शिक्षण, सामाजिक कार्य, आरोग्य, स्वयंरोजगार तसेच महिला बचत गट चळवळीत कार्यरत महिलांचा सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमात महिला बचत गटाने सादर केलेल्या नृत्य, गीत व अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरणात रंगत आणली. याशिवाय महिलांसाठी मनोरंजनात्मक खेळ व विविध स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये महिलांनी उत्साहाने सहभाग घेत कार्यक्रमाचा आनंद लुटला.

Post a Comment

0 Comments