अमरावतीत इंधन तुटवड्याची अफवा; - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Monday, March 30, 2026

अमरावतीत इंधन तुटवड्याची अफवा;


 जिल्हा प्रशासनाचे नागरिकांना शांततेचे आवाहन

अमरावती, दि. ३० (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : गेल्या काही दिवसांपासून अमरावती शहरासह जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्याच्या अफवा सोशल मीडियावर पसरत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात इंधनाचा मुबलक साठा उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले असून नागरिकांनी घाबरून न जाता संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे.

शहरातील अग्रसेन पेट्रोल पंप, (आयटीआय कॉलेज समोरील पंप ) तसेच राजेश आणि विदर्भ गॅस एजन्सी या ठिकाणी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी सर्व ठिकाणी साठा पुरेसा असल्याचे निदर्शनास आले. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी गॅस एजन्सीवर पिण्याचे पाणी, ग्राहकांना बसण्यासाठी आसनव्यवस्था, सावलीसाठी शेड उभारण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. तसेच प्रत्येक तासाला पेट्रोल पंपावरील उपलब्ध साठ्याची माहिती दर्शनी भागात लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.

प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, इंधन पुरवठा साखळी सुरळीत असून तेल कंपन्यांचे प्रतिनिधी सातत्याने यावर लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे 'पॅनिक बाइंग' (गरजेपेक्षा जास्त खरेदी) टाळावी, कारण यामुळेच विनाकारण गर्दी होऊन वाहतुकीची कोंडी व कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही जिल्हा प्रशासनाने दिला आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages