पोलीस पाटील हा प्रशासनाचा कणा -- पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Monday, March 30, 2026

पोलीस पाटील हा प्रशासनाचा कणा -- पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे





अमरावती, दि. ३० (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क):
ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यात पोलीस पाटीलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. शासन आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून काम करणारा पोलीस पाटील खऱ्या अर्थाने प्रशासनाचा कणा आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. 

             शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख स्टेडीयम स्पोर्ट व वाणिज्य संकुल, नवसारी  येथे आयोजित 'पोलीस पाटील परिषदे'त पालकमंत्री श्री. बावनकुळे बोलत होते.  

             खासदार डॉ.अनिल बोंडे, आमदार राजेश वानखडे, महापौर श्रीचंद तेजवानी, प्रवीण पोटे पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

               ग्रामीण स्तरावर 'पोलीस पाटील' हे प्रशासनाचे डोळे आणि कान म्हणून काम करतात. गुन्हेगारी नियंत्रण आणि शासकीय योजनांची अंमलबजावणी यात त्यांचा सहभाग मोलाचा असतो. त्यांच्या सक्षमीकरणासाठी शासन कटिबद्ध आहे. पोलीस पाटीलांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी लवकर मुख्यमंत्री महोदयांकडे बैठक आयोजित करण्यात येईल. पोलीस पाटीलांच्या समस्या शासनस्तरावर मार्गी लावण्याचे आश्वासन  पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी यावेळी दिले.

प्रशासनात पोलीस पाटीलांचे स्थान अनन्यसाधारण आहे. ग्रामीण स्तरावर होणाऱ्या प्रत्येक घडामोडीची माहिती प्रशासनापर्यंत पोहोचवण्यात पोलीस पाटील महत्त्वाची भूमिका बजावतात. गावपातळीवर वाद मिटवणे, गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांना मदत करणे आणि शासकीय योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवणे, अशा बहुआयामी जबाबदाऱ्या ते पार पाडत आहेत.

ग्रामीण भागातील सुरक्षिततेसाठी पोलीस पाटीलांनी दिलेले योगदान मोलाचे असल्याचे गौरवोद्गार पालकमंत्री श्री. बावनकुळे काढले.

 उत्कृष्ट कार्य केलेल्या पोलीस पाटलांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करून सत्कार करण्यात आला. पालकमंत्री श्री. बावनकुळे यांच्या हस्ते यावेळी तीन रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. तसेच आमदार राजेश वानखडे यांच्या वाढदिवसानिमित्त पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी त्यांना सपत्नीक शुभेच्छा देऊन त्यांचा सत्कार केला.

              पोलीस पाटील परिषदेला जिल्ह्यातील पोलीस पाटील, प्रशासकीय अधिकारी, पोलीस विभागातील अधिकारी, नागरिक उपस्थित होते.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages