वसुधाताईंचे कार्य आजच्या तरुण पिढीसाठी दीपस्तंभासारखे प्रेरणादायी - पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Monday, March 30, 2026

वसुधाताईंचे कार्य आजच्या तरुण पिढीसाठी दीपस्तंभासारखे प्रेरणादायी - पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

 






माजी राज्यमंत्री वसुधाताई देशमुख यांना 'जीवनगौरव' पुरस्कार प्रदान

           अमरावती, दि. ३० (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): माजी राज्यमंत्री वसुधाताई देशमुख यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय आणि सामाजिक कारकिर्दीत केवळ सत्ताकारण न करता समाजकारणाचा वारसा खऱ्या अर्थाने जपला आहे.  त्यांनी महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण विकासासाठी केलेल्या कार्य कर्तृत्वाने वेगळी ओळख निर्माण केली. त्यांचे कार्य आणि अनुभव आजच्या तरुण पिढीसाठी एका दीपस्तंभासारखा प्रेरणादायी आहे, असे गौरवपूर्ण उद्गार पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काढले.

          सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील प्रदीर्घ योगदानाबद्दल वसुधाताई देशमुख यांना श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृह येथे आयोजित सोहळ्यात 'जीवनगौरव पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले, त्यावेळी पालकमंत्री बोलत होते.

            यावेळी व्यासपीठावर खासदार डॉ. अनिल बोंडे, खासदार बळवंत वानखेडे, आमदार जयंत पाटील, सुलभा खोडके, संजय खोडके, महापौर श्रीचंद तेजवानी, माजी मंत्री अनिल देशमुख, विलास इंगोले यांच्यासह जिल्ह्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

        पालकमंत्री श्री. बावनकुळे म्हणाले की, ग्रामीण भागाचा विकास आणि महिला सक्षमीकरण हे वसुधाताईंच्या कार्याचे मुख्य केंद्रबिंदू राहिले असून हा पुरस्कार त्यांच्या तपोनिष्ठ सेवेची समाजाने घेतलेली दखल आहे. ताईंच्या प्रेरणेमुळे आज विदर्भातील महिलाआत्मनिर्भर होऊन काम करीत आहेत. वसुधाताईंचे कर्तव्यदक्ष , दिशा देणारे विचार, उत्तम वैचारिक भूमिका इतरांसाठी आदर्श व प्रेरणादायी आहे.


त्यांची विदर्भाच्या प्रश्नाबाबतची जाण सखोल आहे. ते समजून घेण्यासाठी लवकरच मी त्यांची भेट घेऊन त्यांचे विचार जाणून घेणार आहे व पालकमंत्री म्हणून त्या विषयावर कार्य करणार आहे.

        विदर्भाचे विकासासाठी वसुधाताई आयुष्यभर झटल्यात. वसुधाताईंनी विदर्भाच्या विकासासाठी रचलेल्या पायाचा कळस पूर्ण करण्याचे कार्य मी पूर्ण करेल. त्यांचे अमरावतीच्या विकासासाठी अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याचा संकल्प करतो. विदर्भाच्या विकासासाठी त्यांची तळमळ वाया जाणार नाही. तो विकास पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे  पालकमंत्री श्री. बावनकुळे यावेळी म्हणाले .

         पुरस्काराला उत्तर देताना वसुधाताई देशमुख म्हणाल्या, हा 'जीवनगौरव' पुरस्कार म्हणजे केवळ माझा वैयक्तिक सन्मान नसून, गेल्या अनेक दशकांपासून माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेल्या सामान्य जनतेचा आणि कार्यकर्त्यांचा सन्मान आहे, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. सार्वजनिक जीवनात काम करताना समाजाचे ऋण फेडणे हेच आपले मुख्य ध्येय असल्याचे सांगून त्या म्हणाल्या की, राजकीय प्रवासात अनेक चढ-उतार आले, परंतु सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवताना मिळणारे समाधान सर्वात मोठे होते.

 हा प्रवास कठीण होता, पण लोकांच्या प्रेमामुळे तो सुखकर झाला. माझ्या कामावर विश्वास ठेवून मला सदैव सहकार्य करणारे, माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या माझ्या जनतेचा हा पुरस्कार आहे . शेवटच्या श्वासापर्यंत जनसेवेचे हे व्रत आपण अखंडपणे सुरू ठेवणार असल्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.

     या सोहळ्यात अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील दहयांद्री गावातील 'रुक्मिणी' या मुलींच्या नवीन वसतीगृह इमारतीचे मान्यवरांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. तसेच प्रा. नवनीत देशमुख लिखित वसुधाताईंच्या जीवनप्रवासावर आधारित 'वसुधा' या कादंबरीचेही प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमाचे  संचालन शिप्रा मानकर यांनी केले तर प्रा. विनय वसुले यांनी आभार मानले.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages