शिवजयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनातर्फे विशेष व्याख्यान आणि भव्य बाईक रॅलीचे आयोजन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, February 19, 2026

शिवजयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनातर्फे विशेष व्याख्यान आणि भव्य बाईक रॅलीचे आयोजन



अमरावती, दि. १९ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून अमरावती जिल्हा प्रशासनाच्या वतीने 18 आणि 19 फेब्रुवारी रोजी शहरात विविध सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने या सोहळ्याचे  आयोजन केले असून, शिवरायांची विचारधारा आणि व्यवस्थापन कौशल्य जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा मानस व्यक्त केला आहे.

कार्यक्रमाची सुरुवात बुधवारी, दि. 18 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे होणाऱ्या व्याख्यानाने होईल. यावेळी 'शिवश्री' प्रा. प्रेमकुमार बोके आणि प्रा. डॉ. वैभव मस्के हे छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्यकर्तृत्व, त्यांचे शौर्य आणि आजही सुसंगत असलेली त्यांची विचारधारा या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

शिवजयंतीच्या दिवशी, म्हणजे 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता भीमटेकडी येथून भव्य बाईक रॅली काढण्यात येणार आहे. ही रॅली यशोदा नगर चौक, कल्याण नगर चौक, राजापेठ उड्डाणपूल, राजकमल चौक, श्याम चौक, जयस्तंभ चौक, चित्रा चौक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक अशा मुख्य मार्गावरून जात शिवटेकडी येथील शिवाजी महाराज पुतळ्यापाशी विसर्जित होईल. या रॅलीचे खास आकर्षण म्हणजे मार्गातील ठिकठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. राजकमल चौक, इर्विन चौक आणि माँ जिजाऊ पुतळा परिसर येथे शिवरायांच्या जीवनावर आधारित पथनाट्य सादर केले जाणार आहे. तसेच माँ जिजाऊंच्या पुतळ्याजवळ वीररसातील पोवाड्याचे सादरीकरण करून शिवरायांना मानवंदना दिली जाईल. या सर्व कार्यक्रमांमध्ये अमरावतीकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन तहसिलदार विजय लोखंडे यांनी केले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages