जिल्ह्यात उत्सवांच्या काळात ध्वनीक्षेपकांना रात्री 12 पर्यंत मुभा; - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, February 19, 2026

जिल्ह्यात उत्सवांच्या काळात ध्वनीक्षेपकांना रात्री 12 पर्यंत मुभा;



जिल्हाधिकाऱ्यांचे 15 दिवसांच्या शिथिलतेचे आदेश

अमरावती, दि१९ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): आगामी विविध सण आणि उत्सवांच्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यातील नागरिकांसाठी प्रशासनाने मोठा दिलासा दिला आहे. जिल्ह्यात ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक यंत्रणेच्या वापरासाठी वर्षभरातील एकूण 15 दिवसांची विशेष शिथिलता देण्याचे आदेश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी जारी केले आहेत. केंद्र शासनाच्या ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) सुधारित नियम 2017 मधील तरतुदींचा आधार घेत ही परवानगी देण्यात आली आहे.

या आदेशानुसार, निश्चित केलेल्या उत्सवांच्या दिवशी सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरता येणार आहे. एरव्ही रात्री 10 वाजेपर्यंत असलेली ही मर्यादा आता काही विशेष दिवसांसाठी वाढवण्यात आली आहे. ज्या उत्सवांसाठी ही सवलत लागू असेल त्यात प्रामुख्याने 19 फेब्रुवारी रोजीची शिवजयंती, 26 मार्चला श्रीराम नवमी, 14 एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि 1 मे रोजीच्या महाराष्ट्र दिनाचा समावेश आहे.

तसेच वर्षाच्या उत्तरार्धात 4 सप्टेंबरला श्रीकृष्ण जयंती, 14 सप्टेंबरला गणपती उत्सव, 25 सप्टेंबरला अनंत चतुर्दशी आणि 15 ऑक्टोबरला नवरात्र पंचमीसाठी ही सूट असेल. नवरात्रीचे मुख्य दोन दिवस म्हणजे 19 व 20 ऑक्टोबर, तसेच दिवाळीमध्ये 6 नोव्हेंबरला धनत्रयोदशी आणि 8 नोव्हेंबरला लक्ष्मीपूजनाच्या दिवशीही रात्री 12 पर्यंत ध्वनीक्षेपक सुरू ठेवता येतील. वर्षाच्या शेवटी 25 डिसेंबर (नाताळ) आणि 31 डिसेंबर रोजीही ही सवलत लागू राहील.

मात्र, ही शिथिलता देताना जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी काही कडक अटीही घातल्या आहेत. झोननिहाय ठरवून दिलेली ध्वनी मर्यादा कोणत्याही परिस्थितीत ओलांडता येणार नाही. विशेषतः रुग्णालय, शैक्षणिक संस्था आणि न्यायालये यांसारख्या 'शांतता क्षेत्र' घोषित परिसरात ही सवलत लागू असणार नाही. नियमांचे उल्लंघन झाल्यास त्याची सर्व जबाबदारी संबंधित आयोजक आणि यंत्रणेवर राहील, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. सर्व नागरिकांनी आणि उत्सव मंडळांनी प्रशासकीय नियमांचे पालन करून उत्सव शांततेत साजरे करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages