जलयुक्त शिवारच्या कामांचे त्रयस्त संस्थांकडून ऑडिट - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, February 4, 2026

जलयुक्त शिवारच्या कामांचे त्रयस्त संस्थांकडून ऑडिट



अमरावती, दि. ५ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) :
महत्त्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार अभियान २.०’अंतर्गत जिल्ह्यातील विविध जलसंधारण कामांची गुणवत्ता आणि परिणामकारकतेची त्रयस्त संस्थेमार्फत तपासणी करण्यात येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या कामांच्या मूल्यांकनासाठी दोन अभियांत्रिकी संस्थांची निवड केली असून, प्रत्यक्ष स्थळपाहणीला सुरुवात झाली आहे.

जिल्ह्यात झालेल्या कामांचे निष्पक्ष मूल्यांकन व्हावे, यासाठी सिपना कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, अमरावती आणि प्रो. राम मेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, बडनेरा या दोन संस्थांची नियुक्ती करण्यात आली आहे. या संस्थांचे तज्ज्ञ पथक जिल्ह्यातील प्रशासकीय मान्यता मिळालेल्या कामांचे ऑडिट करीत आहेत.

अभियानांतर्गत विविध शासकीय यंत्रणांमार्फत करण्यात आलेली कामे या मूल्यांकनाच्या कक्षेत आहेत. यात नाला खोलीकरण व रुंदीकरण, सिमेंट नाला बांध व त्यातील गाळ काढणे, विहीर पुनर्भरण व रिचार्ज शाफ्टची कामे, शेततळे, समतल चर आणि गॅबियन बंधारे, नदी पुनरुज्जीवन व खोलीकरणासह डोह निर्मिती यांचा समावेश आहे.

मूल्यांकन केवळ कामाची भौतिक स्थिती तपासण्यापुरते मर्यादित नसून, त्यात तांत्रिक बाबींना विशेष महत्त्व दिले जात आहे. यामध्ये मुख्यत्वे कामाची गुणवत्ता, कामाची भौतिक स्थिती. अभियानापूर्वीची भूजल स्थिती, अभियानानंतरची भूजल स्थिती, गाव जल परिपूर्ण झाले असल्याबाबत सविस्तर अहवाल शासनास सादर केला जाणार आहे, असे रोहयो उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर घ्यार यांनी कळविले आहे.



Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages