दि. ५ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क):-
ऑनलाइन गेमिंगच्या नादात तीन सख्ख्या बहिणींनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
उत्तर प्रदेशमधील गाझियाबादमधील भारत सिटी या सोसायटीमध्ये ही घटना घडली. तिन्ही बहिणींनी इमारतीच्या 9 व्या मजल्यावरुन उडी मारुन आयुष्य संपवलं. तिन्ही बहिणी 12, 14 आणि 16 वर्षे वयाच्या होत्या.
घटनास्थळी पोलिसांना एक पॉकेट डायरी सापडली, ज्यामध्ये आठ पानांची सुसाईड नोट होती. सुसाईड नोटमध्ये तिन्ही बहिणींनी त्यांच्या गेम आणि इतर मोबाईल अॅक्टिव्हिटीजचा उल्लेख केला. सॉरी पप्पा आम्हाला माफ करा असे देखील लिहिले आहे, आता तुम्हीच मला सांगा की कुठलीही वाईट कृती करायची आणि सॉरी मला माफ करा असं म्हटल्यानंतर उद्धवलेली बिकट परिस्थिती नीट होते का ?
जीवनाला उद्ध्वस्त करणाऱ्या कोणत्याही वाईट गोष्टीचे व्यसन असे वर्तन आहे जे केवळ तुम्हालाच नाही तर तुमच्या आयुष्यात तुमच्या प्रियजनांनाही दुखवू शकते. व्यसनाच्या आहारी जाऊन स्वतःला उध्वस्त करण्यासाठी टोकाचे पाऊल उचलताना जरा देखील जन्मदात्यांचा विचार येत नसावा का ? कुटुंबीयांना मरण यातना देण्यापूर्वीचं स्वतःचा सांभाळ केला तर किती बरे ना.. आज सर्वीकडे ऑनलाईन गेमचा सुळसुळाट सुरू आहे. ऑनलाइन गेम खेळणाऱ्यांनो याचे दुष्परिणाम जाणून घेणे महत्त्वाचे आहे.ऑनलाइन गेमचे अतिरेकी व्यसन शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. यामुळे आक्रमकता, लठ्ठपणा, निद्रानाश, नैराश्य, अभ्यासात एकाग्रतेचा अभाव, डोळे आणि पाठीचे विकार, सामाजिक एकाकीपणा आणि आर्थिक नुकसान असे गंभीर दुष्परिणाम दिसून येतात. जडलेले व्यसन मानसिक आजाराचे कारण बनू शकते, गेम न खेळल्यास चिडचिड वाढते आक्रमकता आणि नैराश्य येत. सतत हिंसक गेम्स खेळल्याने स्वभावात आक्रमकता येते आणि एकटेपणा वाटू शकतो.
एकाग्रतेचा अभाव होवून अभ्यासात आणि दैनंदिन कामाकडे दुर्लक्ष होतं
शारीरिक आरोग्यावर परिणाम होवून डोळ्यांच्या समस्या वाढतात. स्क्रीनकडे सतत बघितल्याने डोळ्यांचा थकवा, पाणी येणे आणि दृष्टी कमकुवत होते.
सांधेदुखी आणि अंगदुखी: मान, पाठ, हात आणि मनगटाचे स्नायू दुखणे सुरू होते.हालचाल कमी झाल्यामुळे शारीरिक स्थूलपणा आणि हृदयविकाराचा धोका वाढतो
रात्रभर गेम खेळल्यामुळे झोपेची पद्धत बिघडते, थकवा येतो.
सामाजिक एकाकीपणा: मित्र-मैत्रिणी आणि कुटुंबापासून दूर होऊन एकटे राहणे पसंत करू लागतो.तासनतास वाया जातात.
पैशांचे मोठे नुकसान होऊन आपण हरल्याचे दुःख पचवून शकल्याने आपण स्वतःच स्वतःला संपवतो
हे आजचे वास्तव आहे.
पालकांनी मुलांच्या गेमिंग वेळेवर मर्यादा घालणे, त्यांना मैदानी खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि डिजिटल शिस्त लावणे आवश्यक आहे. गाजियाबाद प्रमाणे ऑनलाइन गेमच्या व्यसनाने अल्पवयीन मुलांचा बळी घेण्याच्या घटना वाढल्या असून, पुण्यात १५ वर्षीय मुलाने १४ व्या मजल्यावरून उडी मारून, तर नाशिकमध्ये १६ वर्षीय मुलाने पैसे हारल्यामुळे आत्महत्या केल्याची खळबळजनक प्रकरणे समोर आली आहेत. या गेममधील हिंसक टास्क आणि मानसिक दबाव मुलांचे प्राण घेत आहेत.
पालकांवर सावधगिरी बाळगण्याची मोठी वेळ आली आहे
मुलांच्या मोबाईलमध्ये कोणते गेम्स आहेत,मुले दिवसभर मोबाईलमध्ये गुंतलेली असल्यास वेळीच समुपदेशन,सोशल मीडियावर येणाऱ्या अनोळखी लिंक्स आणि चॅलेंजपासून मुलांना दूर ठेवणे
याकडे लक्ष पुरवणे गरजेचे झाले आहे.
ऑनलाइन गेम हे मनोरंजनाचे साधन नसून मुलांचे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य बिघडवणारे, तसेच जीव घेणारे आहे. याचा विचार प्रत्येक मुला मुलीने करणे देखील महत्त्वाचे आहे. कारण आयुष्य फार सुंदर आहे आणि त्याला सुंदर बनवण्याचं काम मात्र आपल्याच हाती असतं. स्वतःला व्यसनाच्या आहारी जाऊन संपवणं आणि कागदावर मला माफ करा सॉरी शब्द तुमच्या कुटुंबीयांची अश्रू कधीच पुसू शकत नाही. किमान आपल्यावर जिवापाड प्रेम करणाऱ्यांना दु:खाच्या खाईत लोटण्याचा तुम्हाला कोणताही अधिकार नाही हे लक्षात घ्यावे.
सौ कंचन मुरके,अमरावती
Post a Comment
0 Comments