भेदभाव समाप्त करूया, सन्मानाची वागणूक देऊया; - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, January 29, 2026

भेदभाव समाप्त करूया, सन्मानाची वागणूक देऊया;



जिल्ह्यात आजपासून ‘स्पर्श’ कुष्ठरोग जनजागृती अभियान

अमरावती, दि. ३० (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): कुष्ठरोगाविषयी समाजात असलेली भीती, अंधश्रद्धा आणि भेदभाव दूर करून रुग्णांना सन्मानाची वागणूक देण्यासाठी उद्या, 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2026 या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात 'स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान' आणि 'कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र अभियान' राबविण्यात येणार आहे. या मोहिमेच्या जिल्हास्तरीय समन्वय समितीची सभा जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली असून, त्यांनी जिल्ह्यातील नागरिकांना या अभियानात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे.

कुष्ठरोग हा पुरातन काळापासून अस्तित्वात असला, तरी आजही या आजाराबद्दल अनेक भ्रामक कल्पना समाजात आहेत. ही परिस्थिती बदलण्यासाठी आणि कुष्ठरुग्णांना भारतीय संविधानाने दिलेल्या 'समानतेच्या अधिकाराची' जाणीव करून देण्यासाठी यंदा ‘भेदभाव समाप्त करूया, सन्मानाची वागणूक देऊया’ हे घोषवाक्य निश्चित करण्यात आले आहे.

बहुविध औषधोपचार पद्धतीमुळे हा आजार शंभर टक्के बरा होतो. सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये यावरील औषध मोफत उपलब्ध आहे. वेळेत उपचार घेतल्यास कुष्ठरोगामुळे येणारी शारीरिक विकृती पूर्णपणे टाळता येते. मात्र, निदानास उशीर झाल्यास रुग्णाच्या कार्यक्षमतेवर आणि पर्यायाने देशाच्या आर्थिक प्रगतीवरही परिणाम होतो.

या अभियानामध्ये नियमित सर्वेक्षणासोबतच समाजातील वंचित घटकांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. यामध्ये वीटभट्टी कामगार, खाणकामगार, कारखान्यातील मजूर, कारागृहातील बंदी, तसेच आश्रमशाळा आणि वसतिगृहातील विद्यार्थ्यांची विशेष तपासणी केली जाणार आहे. कुष्ठरोगाची कोणतीही लक्षणे आढळल्यास घाबरून न जाता तातडीने शासकीय यंत्रणेशी संपर्क साधावा आणि उपचार पूर्ण करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages