लाडकी बहीण योजना: पात्र महिलांच्या अर्जातील त्रुटी सुधारण्याची संधी - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, January 29, 2026

लाडकी बहीण योजना: पात्र महिलांच्या अर्जातील त्रुटी सुधारण्याची संधी




अमरावती, दि. ३० (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क)
: राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य व पोषणात सुधारणा करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या अंमलबजावणीत काही तांत्रिक अडचणी समोर आल्या आहेत. ज्या पात्र महिलांनी ई-केवायसी किंवा आधार प्रमाणीकरण करताना चुकीचा पर्याय निवडला आहे, अशा महिलांचे लाभ सध्या तांत्रिक कारणास्तव बंद झाले आहेत. या त्रुटी सुधारण्यासाठी पात्र महिलांनी त्वरित आपल्या संबंधित अंगणवाडी सेविकेशी संपर्क साधून दुरुस्ती प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अतुल भडांगे यांनी केले आहे.

या योजनेची प्रक्रिया पूर्ण करताना लाभार्थी महिलांकडून तांत्रिक चुका झाल्याचे निदर्शनास आले असून, 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देऊनही अनेक अर्ज प्रलंबित आहेत. योजनेच्या नियमानुसार लाभार्थ्याचे वय 21 ते 65 वर्षांच्या दरम्यान असावे आणि ती महिला असावी. तसेच, कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी किंवा निवृत्तीवेतनधारक नसावा. मात्र, अर्ज भरताना किंवा ई-केवायसी करताना अनावधानाने चुकीची माहिती भरली गेल्यामुळे अनेक पात्र महिला या लाभापासून वंचित राहिल्या आहेत. अशा महिलांची यादी आता प्रत्यक्ष पडताळणीसाठी बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी व ग्रामीण) यांच्याकडे पाठविण्यात आली आहे.

ज्या महिलांचा लाभ तांत्रिक कारणास्तव थांबला आहे, त्यांनी आपल्या अंगणवाडी सेविकेकडे स्वयंघोषणा पत्र भरून द्यावे. अंगणवाडी सेविका या अर्जांची यादी तयार करून ती बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे सादर करतील, जेणेकरून अर्जातील चुका दुरुस्त होऊन लाभ पुन्हा सुरू होईल. अधिक माहितीसाठी महिलांनी थेट बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाला भेट द्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages