संत्रा पिकावर मोठे संकट: मोर्शी-वरूड तालुक्यात हजारो झाडे नष्ट; शेतकऱ्यांना कोट्यवधींचा फटका - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Monday, October 27, 2025

संत्रा पिकावर मोठे संकट: मोर्शी-वरूड तालुक्यात हजारो झाडे नष्ट; शेतकऱ्यांना कोट्यवधींचा फटका



  • संत्रा पीक समूळ नष्ट होण्याच्या मार्गावर; कोट्यवधींचे नुकसान

  • संकटात संत्रा बागायतदार: मोर्शी-वरूडमध्ये हजारो झाडे वाळली; कोट्यवधींच्या नुकसानीमुळे उत्पादनात मोठी घसरण

  •  अमरावती, दि.२७ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): अमरावती जिल्ह्यातील मोर्शी आणि वरुड तालुक्यांतील  संत्रा उत्पादक शेतकरी आज गंभीर संकटात आहेत. एके काळी समृद्धीचे प्रतीक असलेले संत्रा पीक आता रोग, गळती आणि हवामानातील अनिश्चिततेमुळे टिकवणे अवघड झाले आहे. बागांतील झाडे पिवळी पडत असून फांद्या सुकत आहेत आणि फळगळ प्रचंड वाढली आहे. गेल्या काही वर्षांपासून उत्पादनात घट होत आहे. 

    यावर्षी पावसाच्या अनियमिततेने झाडांचे संतुलन पूर्णपणे ढासळले आहे. अतिवृष्टीमुळे मुळांमध्ये साचलेले पाणी आणि नंतरचा कोरडा कालावधी झाडांसाठी घातक ठरला आहे. परिणामी झाडांची रोगप्रतिकारशक्ती कमी होत असून बुरशी, मुळकुज आणि पानगळ वाढली आहे. अनेक शेतकर्यांच्या बागांतील ५० ते ७० टक्के फळे झाडावरून गळून पडली असल्याचे शेतकरी सांगतात. ते औषधांवर हजारो रुपये खर्च करत असले तरी अपेक्षित परिणाम दिसून येत नाहीत. खर्च वाढतोय, उत्पादन घटतेय आणि बाजारभाव स्थिर नसल्याने शेतकरी दुहेरी कचाट्‌यात अडकले आहेत. एका एकरावर तब्बल ८० हजार ते एक लाख रुपये खर्च होतो, पण उत्पादन निम्म्याने घटल्याने अनेकांना पुढचा हंगाम घ्यावा की नाही, हे ठरवता येत नाही. काहींनी तर बागाच उपटण्याचा निर्णय घेतला आहे.

    हवामानबदल हा मुळाशी असलेला धोका

    कृषी तज्ज्ञांच्या मते, हवामानातील सतत होणारे बदल हे संत्रा उत्पादनासाठी घातक ठरत आहेत. अनियमित पावसामुळे झाडांवर ताण येतो, तर वाढ़ते तापमान फुलोर्यावर आणि फळधारणेवर परिणाम करते. जमिनीतील झिंक, लोह, मॅग्नेशियम यांसारख्या सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे झाडांची वाढ खुंटते आणि रोगांचा प्रसार वाढतो. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की सध्या रोगनिवारण मोहिमा, माती-पाणी परीक्षण, आणि योग्य मार्गदर्शन मोहीम राबवणे अत्यावश्यक आहे.

    परिश्रमावर संकटाची सावली

    मोर्शी-वरूड परिसरातील हजारो शेतकर्यांनी आपल्या आयुष्याची बचत या पिकात गुंतवली आहे. मात्र झाडे वाळू लागल्याने त्यांचे मनोधैर्य खचले आहे. शासन व कुक्षी विभागाने तातडीने हस्तक्षेप करून ठोस उपाययोजना केल्या नाहीत, तर या दोन तालुक्यांतील संत्रा उत्पादनाचा सुवर्णकाळ केवळ आठवणीत राहील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.



    Post Bottom Ad

    Responsive Ads Here

    Pages