लोकशाही दिनातील प्रकरणांचा तातडीने निपटारा करा - विभागीय आयुक्त नयना गुंडे यांचे विभागप्रमुखांना निर्देश - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Tuesday, August 11, 2026

लोकशाही दिनातील प्रकरणांचा तातडीने निपटारा करा - विभागीय आयुक्त नयना गुंडे यांचे विभागप्रमुखांना निर्देश






          अमरावती, दि. ११ : विभागीय लोकशाही दिनात येणाऱ्या प्रकरणांवर ठरलेल्या वेळेत कार्यवाही करून अंतिम अहवाल सादर करावा. तसेच संबंधित अर्जदाराला केलेल्या कार्यवाहीची माहिती द्यावी. प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी प्रत्यक्ष स्थळ पाहणी, मुद्देनिहाय चौकशी आणि आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून स्पष्ट अंतिम अहवाल सादर करावा, असे निर्देश विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी संबंधित विभागप्रमुखांना दिले.

            विभागीय आयुक्तालयाच्या सभागृहात श्रीमती गुंडे यांच्या अध्यक्षतेखाली आज विभागीय लोकशाही दिनाचे कामकाज पार पडले. यावेळी अपर आयुक्त संजय जाधव, अपर आयुक्त (महसूल) अनिल खंडागळे, अपर आयुक्त (न्याय शाखा) सुभाष बोरकर, सहाय्यक आयुक्त वैशाली पाथरे, गीता वंजारी, श्यामसुंदर देशमुख यांच्यासह महसूल, पोलीस, महापालिका, सहकार, कृषी, जलसंधारण व ऊर्जा विभागाचे अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित होते. तसेच जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी व संबंधित अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीला उपस्थित होते.

            यावेळी अमरावती विभागातून आलेल्या ६ प्रकरणांवर सविस्तर चर्चा करून प्रत्येक तक्रारीचा आढावा घेण्यात आला. त्यापैकी २ प्रकरणे निकाली काढण्यात आली, तर ३ प्रकरणे नव्याने दाखल झाली. उर्वरित प्रलंबित प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी संबंधित विभागांनी आवश्यक कार्यवाही करून अंतिम अहवाल सादर करावेत, असे निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले.

            लोकशाही दिनात नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारी गांभीर्याने घेऊन त्यावर वेळेत आणि प्रभावी कार्यवाही करावी. केवळ अहवाल देण्यापुरते न थांबता प्रत्यक्ष काम करून तक्रारींचा निपटारा होईल, यासाठी सर्व विभागांनी विशेष लक्ष द्यावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

            दरम्यान, विभागीय महिला लोकशाही दिनांतर्गत एक प्रकरण दाखल झाले असल्याची माहिती महिला व बालविकास विभागाच्या वतीने देण्यात आली व पुढील कार्यवाहीचे निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले.


--

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages