उत्तम जीवनशैली हा निरोगी आयुष्याचा पाया - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, September 25, 2025

उत्तम जीवनशैली हा निरोगी आयुष्याचा पाया





*’जागर महिला आरोग्याचा’ मध्ये मेंदूरोगतज्ज्ञ डॉ. सिकंदर अडवाणी व हृदय रोग तज्ज्ञ

डॉ. पवन अग्रवाल यांचे मार्गदर्शन*

            

      अमरावती, दि. 26 (ग्रामीण उदय प्रतिनिधी): अहिल्यादेवी होळकर यांच्या तिनशेव्या जयंतीनिमित्त जिल्हा प्रशानातर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नवरात्रोत्सवात महिलांच्या आरोग्याबाबत मार्गदर्शन आणि तपासणी शिबिर घेण्यात येत आहे. आज या शिबिरामध्ये हृदय व मेंदू रोगाविषयी माहिती देण्यात आली. 'मेंदू रोगाविषयी मार्गदर्शन ' या विषयावर मेंदूरोगतज्ज्ञ डॉ. सिकंदर अडवाणी यांनी तर 'जीवनशैली व हृदयरोगाविषयी मार्गदर्शन' या विषयावर डॉ.पवन अग्रवाल यांनी  मार्गदर्शन केले. यावेळी उपजिल्हाधिकारी श्रद्धा उदावंत, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, जिल्हा खणिकर्म अधिकारी प्रणिता चाफले, नायब तहसीलदार श्रीमती मिसाळ आदी उपस्थित होते.

            जिल्हा नियोजन सभागृहात जागर महिला आरोग्याचा उपक्रमामध्ये राबविण्यात येत आहे. यात मेंदू रोगाविषयी मार्गदर्शन करतांना डॉ. सिकंदर अडवाणी म्हणाले, बदलती जीवनशैली आणि वाढत्या ताणतणावांचे वेळीच योग्य व्यवस्थापन न झाल्यामुळे आजकाल विविध शारीरिक तसेच मानसिक व्याधींचे प्रमाण वाढत आहे. पूर्वी सहसा 50 वर्षावरील व्यक्तींना होणारे आजार  आज 18 वर्षाखालील मुला-मुलींनाही होत आहे. पूर्वीपेक्षा जीवन गतिमान झाले आहे. स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी प्रत्येक जण धावत आहे. परंतु यामुळे बऱ्याच जणांना आरोग्य साधनेला पुरेसा वेळ देता येत नाही. यातून अनेक आजार नकळत डोके वर काढतात. यासाठी कितीही व्यस्त असाल तरीही स्वतःसाठी पुरेसा वेळ द्या. उपचारासाठी वेळ दिल्यापेक्षा काळजी घेणे केव्हाही हितावह आहे. श्वसन प्रक्रिया ही एक सामान्य प्रक्रिया असली तरीही पूर्ण शरीराचे संतुलन त्यावर राहते. यामुळे नियमित योग, प्राणायाम अथवा झेपेल असे शारीरिक श्रम करा. सकस आहारावर भर द्या. शरीराप्रमाणे मेंदूही थकतो, त्यालाही विश्रांती हवी असते. यासाठी कामाबरोबरच छंदही जोपासा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

             डॉ. पवन अग्रवाल म्हणाले, भारतामध्ये तंबाखूच्या सेवनाचे प्रमाण जास्त आहे. प्रकृती चांगली ठेवण्यासाठी सर्वप्रथम सर्व व्यसनांपासून दूर राहा. कोणतीही शारीरिक व्याधी जाणवल्यास तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा. स्वतःच्या दुखण्याचे स्वतः अनुमान लावू नये. लवकर निदान झाल्यास लवकर उपचार सुरू होतात. आपल्याजवळ असलेल्या सुख समृद्धीचा लाभ घेण्यासाठी उत्तम आरोग्य असणे गरजेचे आहे. झोपण्यापूर्वी मोबाईल बघू नये.  कितीही व्यस्त असाल, तरीही प्रत्येकाने दिवसातील किमान एक तास स्वतःच्या आरोग्याला द्यावा. यामुळे कौटुंबिक तसेच कार्यालयीन कामकाजावर निश्चितच सकारात्मक प्रभाव पडेल,असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन चैताली यादव यांनी तर आभार रूपाली आंबेकर यांनी मानले. 



Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages