अमरावती, दि. २२ (ग्रामीण उदय प्रतिनिधी): राज्यातील शेतक-यांचे केवळ उत्पादन व उत्पादकता वाढविणे हे ध्येय यापुढे न राहता उत्पादित होणा-या शेतीमालाची दर्जात्मक सुधारणा करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांनी करणे गरजेचे आहे. शेतीशी निगडित घटकांबाबत जगात वेळोवेळी होत असलेले बदल, विकसित होत असलेले तंत्रज्ञान हे शेतकऱ्यांपर्यंत त्यांच्या गरजेनुरुप पोहोचविणे आणि त्यासाठी आवश्यक सहाय्य व सोयीसुविधा पुरविणे निकडीचे आहे. यासाठी कृषि विस्तार कार्यक्रमाद्वारे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी कृषी विभागाकडून त्यादृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत.
विविध देशांनी विकसित केलेले शेतीविषयक तंत्रज्ञान व तेथील शेतकऱ्यांनी त्याचा केलेला अवलंब व त्याद्वारे त्यांच्या उत्पनात झालेली वाढ याबाबत त्या देशातील शास्त्रज्ञ, शेतकरी यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा, क्षेत्रीय भेटी तसेच संस्था भेटी यासाठी राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे आयोजित करणे, हे या योजनेचे उद्दीष्ट आहे. त्यानुसार सन २०२५-२६ मध्ये राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेरील अभ्यास दौऱ्यांचे आयोजन करण्यात येत आहे. सदर योजनेंतर्गत युरोप, इस्त्राईल, चीन, जपान, मलेशिया, व्हिएतनाम, फिलीपाईन्स व दक्षिण कोरीया देशांची निवड करण्यात आली आहे.
यासाठी लाभार्थी हा स्वतः शेतकरी असावा. स्वतःचे नावे चालु कालावधीचा (मागील सहा महिन्यातील) 7/12 व 8-अ उतारा असावा. उत्पन्नाचे मुख्य साधन शेती असावे. शेतकरी कुटुंबामधून फक्त एकाच व्यक्तीला लाभ घेता येईल. शेतकऱ्यांचे अॅग्रीस्टॅक अंतर्गत फार्मर आय डी असणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांचे वय सहलीला निघण्याच्या दिवशी २५ वर्ष पूर्ण असावे. शेतकरी वैध पारपत्रधारक (पासपोर्ट) असावा. तरी इच्छुक शेतकऱ्यांनी देशाबाहेरील अभ्यास दौऱ्यात सहभागी व्हावे, अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी किंवा जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी केले आहे.
Post a Comment
0 Comments