मराठा-कुणबी विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणाची संधी
· ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी सारथीचे fs.maharashtra.gov.in संकेतस्थळ उपलब्ध
· १६ जून अर्ज करण्याची अंतिम तारीख
· विद्यार्थ्यांनी सुवर्ण संधीचा लाभ घेण्याचे आवाहन
अमरावती दि. ३१ : मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या जातीतील गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत पुरवणारी "महाराजा सयाजीराव गायकवाड-सारथी गुणवंत मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना" शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून प्रभावीपणे राबविली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून दरवर्षी ७५ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान केली जाते. ही योजना मराठा कुणबी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन देणारी ठरली आहे. नमूद प्रवर्गातील इच्छुक विद्यार्थ्यांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सारथीचे उपव्यवस्थापकीय संचालक विवेक जाधव यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले.
इच्छुक विद्यार्थ्यांनी सारथीच्या fs.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर विहीत नमुन्यात ऑनलाईन अर्ज सादर करावा. अर्ज करण्याची अंतिम तारीख दि. १६ जुन २०२५ आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी Spring २०२५ (एप्रिल ते मे २०२५ ) Fall २०२५ (जुलै, ऑगस्ट सप्टेंबर २०२५) आणि Spring २०२६ (जानेवारी ते मार्च २०२६ ) या कालावधीत प्रवेश घेणारे विद्यार्थी अर्ज करु शकतात.
ही योजना मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या जातीतील विद्यार्थ्यांना परदेशात पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदविका आणि पी एच.डी QS World University Ranking मध्ये २०० च्या आत असलेल्या परदेशातील शैक्षणिक संस्थामध्ये प्रवेश घेणाऱ्या ७५ विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मंजूर केली जाते. यामध्ये ५० जागा पदव्युत्तर पदवी, पदविका आणि २५ जागा पी एच.डी च्या विविध अभ्यासक्रमासाठी राखीव आहेत.
योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क, निर्वाह भत्ता आण वैयक्तिक आरोग्य विमा यासाठी आर्थिक सहाय्य मिळते. प्रति वर्ष पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी कमाल ३० लाख रुपये आणि पीएच.डी अभ्यासक्रमासाठी कमाल ४० लाख रुपये या मर्यादेत शिष्यवृत्तीचा लाभ दिला जातो.
लाभार्थी हा मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी जातीतील महाराष्ट्राचा रहिवासी आणि भारतीय नागरिक असावा. शैक्षणिक पात्रता पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ५५ टक्के गुणांसह पदवी उत्तीर्ण असावी. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी कमाल वय ३५ वर्ष आणि पीएच.डी साठी ४० वर्षे वयोमर्यादा आहे. कुटुंबाचे मागील आर्थिक वर्षातील सर्व मार्गानी प्राप्त एकूण वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे, अशी उत्पन्न मर्यादा आहे.
विद्यापीठ प्रवेश पात्रता QS World University Ranking २०० च्या आत असलेल्या परदेशी विद्यापीठात पूर्णवेळ अभ्यासक्रमासाठी Unconditional Offer Letter असणे आवश्यक असून यापूर्वी कोणतीही राज्य किंवा केंद्र शासनाची परदेशी शिष्यवृत्ती घेतलेली नसावी. अर्धवेळ किंवा एक्झिक्युटिव्ह अभ्यासक्रमांसाठी प्रवेशित विद्यार्थी पात्र ठरणार नाहीत.
सक्षम प्राधिकाऱ्याचा उत्पन्नाचा दाखला आणि ITR (AY २०२५-२६) Form No.१६ , दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर पदवीच्या गुणपत्रिका, इतर आवश्यक दाखले, परदेशी विद्यापीठाचे Unconditional Offer Letter, विद्यापीठाच्या Prospectus ची प्रत, अद्यावत QS World University Ranking ची आदी आवश्यक कागदपत्रे शिष्यवृत्ती लाभ घेण्यासाठी सादर करणे अनिवार्य आहे.
विद्यार्थ्यांना प्रत्येक सत्रासाठी प्रगती अहवाल आणि खर्चाची उपयोगिता प्रमाणपत्रे सादर करणे बंधनकारक राहील. खोटी माहिती किंवा बनावट कागदपत्रे सादर केल्यास फौजदारी कारवाई आणि खर्चाची व्याजासह वसुली केली जाईल. आधिक माहितीसाठी सारथीच्या विभागीय कार्यालयाच्या संपर्क क्रमांक ०२० -२५५९२५०७ वर संपर्क साधावा किंवा सारथीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे सारथीच्या कार्यालयाव्दारे प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.
.png)
Post a Comment
0 Comments