ता. देवरी, जि. गोंदिया- दि.१ ऑक्टोंबर :-(ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क)
वन्यजीव तस्करीविरोधात महसूल गुप्तवार्ता संचालनालय (DRI) नागपूर प्रादेशिक पथकाने देवरी परिसरात एक मोठी आणि धडक कारवाई केली आहे. या कारवाईत बिबट्याची कातडी बाळगणाऱ्या दोन संशयित आरोपींना वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे. देवरी-पुराडा मार्गावरील मोहनटोला परिसरात झालेल्या या कारवाईमुळे परिसरातील वन्यजीव तस्करांच्या हालचाली पुन्हा एकदा जोरदार चर्चेत आल्या आहेत.
DRI च्या नागपूर प्रादेशिक युनिटने २९ सप्टेंबर २०२६ रोजी मोहनटोला परिसरात सापळा रचून ही कारवाई केली. या कारवाईदरम्यान धनराज रामलाल उइके (वय ३५ वर्ष, रा. डव्वाटोला, ता. देवरी) आणि नीलकंठ रामचंद्र पंधरे (वय ३७ वर्ष, रा. श्रीरामपूर, ता. सडक अर्जुनी) या दोघांना संशयास्पद रित्या ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून बिबट्याची कातडी जप्त करण्यात आली आहे.
मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, बिबट्याची कातडी पांढऱ्या कापडात गुंडाळून ठेवली असल्याचे समोर आले होते. DRI च्या पथकाने कारवाई करत स्वतंत्र पंचांच्या उपस्थितीत याचा रीतसर पंचनामा केला. जप्त केलेली कातडी आणि त्यासंबंधित इतर साहित्य सीलबंद करण्यात आले आहे.
बिबट्या हा संरक्षित वन्यप्राणी असून त्याची कातडी बाळगणे, खरेदी-विक्री करणे किंवा अवैध व्यापार करणे कायद्याने गंभीर गुन्हा आहे. या प्रकरणात वन्यजीव संरक्षण अधिनियम, १९७२ अंतर्गत पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे. DRI ने प्राथमिक कारवाई पूर्ण केल्यानंतर जप्त केलेली कातडी, दोन्ही संशयित आरोपी आणि संबंधित कागदपत्रे पुढील तपासासाठी देवरी वनविभागाच्या स्वाधीन केली आहेत.
आता या प्रकरणाचा पुढील तपास वनविभागाकडून केला जात आहे. जप्त करण्यात आलेली ही कातडी नेमकी कुठून आणण्यात आली? ती कोणाकडून मिळाली? आणि याचा व्यवहार कोणासोबत होणार होता? या संपूर्ण साखळीचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणात आणखी काही व्यक्ती किंवा मोठे तस्करांचे जाळे कार्यरत असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
देवरी परिसरात वन्यजीवांच्या अवैध शिकारीला आणि तस्करीला आळा घालण्यासाठी वनविभागाने कडक पावले उचलली असून, या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता संपूर्ण साखळी (Racket) उघडकीस आणण्याकडे प्रशासनाचे विशेष लक्ष लागले आहे.