थॅलेसेमिया प्रतिबंधासाठी जनजागृतीला गती द्यावी -सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, September 25, 2026

थॅलेसेमिया प्रतिबंधासाठी जनजागृतीला गती द्यावी -सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर


·        ‘एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे’ अभियानाच्या प्रगतीचा

 


मुंबई,
दि. २५ : थॅलेसेमिया या अनुवंशिक रक्तविकाराच्या प्रतिबंधासाठी जनजागृती, वेळेवर तपासणी आणि समुपदेशनावर अधिक भर देण्यात यावा. थॅलेसेमियाबाबत समाजातील विविध घटकांमध्ये व्यापक जनजागृती निर्माण करून प्रतिबंधात्मक उपाययोजनांना गती द्यावी, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिले.

 

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली ‘एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे’ अभियानाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आरोग्य भवन, येथे बैठक झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या.


 

‘एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे’ अभियानाच्या वर्षपूर्तीनिमित्त १ ते ८ मे २०२६ या कालावधीत ‘संकल्प सप्ताह’ आयोजित करण्यात आला होता. या माध्यमातून व्यापक लोकसहभाग निर्माण करून थॅलेसेमिया प्रतिबंधासाठी जनजागृती करण्यात आली. पुढील काळातही अभियान अधिक प्रभावीपणे राबवून थॅलेसेमियाच्या प्रतिबंधासाठी आवश्यक उपाययोजनांना गती देण्याच्या सूचना राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर यांनी दिल्या.

 

राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या, थॅलेसेमिया हा अनुवंशिक रक्तविकार असून, त्याच्या प्रतिबंधासाठी जनजागृती, वेळेवर तपासणी आणि योग्य समुपदेशन महत्वाचे आहे. नागरिक, विद्यार्थी, गर्भवती महिला तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये थॅलेसेमियाबाबत आवश्यक माहिती पोहोचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने सातत्याने प्रयत्न करावेत.

 

थॅलेसेमिया मायनर असलेल्या व्यक्तींमध्ये आजाराची तीव्र लक्षणे दिसून येतीलच असे नाही. मात्र, दोन थॅलेसेमिया मायनर व्यक्तींच्या विवाहामुळे त्यांच्या अपत्याला थॅलेसेमिया होण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे विवाहपूर्व तपासणी, समुपदेशन आणि वैद्यकीय मार्गदर्शन यांना विशेष महत्त्व आहे. या दृष्टीने थॅलेसेमिया तपासणी, एचपीएलसी/इलेक्ट्रोफोरेसिस चाचणी, रक्तदान शिबिरे, गर्भवती महिलांचे समुपदेशन, आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण तसेच शाळा-महाविद्यालयांमध्ये जनजागृती उपक्रम राबवावेत, असे त्यांनी सांगितले.

 

थॅलेसेमियाचे वेळेवर निदान, योग्य उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या माध्यमातून या आजाराचा प्रभाव कमी करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग आवश्यक आहे. थॅलेसेमिया रुग्णांच्या कुटुंबातील व्यक्तींची तपासणी व समुपदेशन करून त्यांना आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन उपलब्ध करून द्यावे, असेही राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी सांगितले.

 

बैठकीस आयुक्त संजय काटकर, आयुक्त (शहरी) डॉ. सुनील भोकरे, संचालक डॉ. विजय कंदेवाड, उपसचिव राजश्री सारंग, राज्य समन्वयक लक्ष्मीकांत पिंपळगांवकर, मुख्यमंत्री कार्यालयाचे समन्वयक चेतन भोजकर उपस्थित होते. दूरदृश्य प्रणालीद्वारे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व मंडळांचे उपसंचालक सहभागी झाले होते.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages