‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती’ चा लाभ
अमरावती,दि.29 (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : समाज कल्याण विभागाच्या ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती’ योजनेने घडविलेल्या विकास तातड यांचा ‘चहाच्या टपरीपासून कोलंबिया विद्यापीठापर्यंत’चा प्रवास अमरावतीतील युवा पिढीसाठी प्रेरणादायी ठरत आहे. शासकीय योजनेच्या लाभातून घडलेल्या या प्रवासासाठी ‘आशीर्वादाचा दिवा’ उपक्रमांतर्गत विकास तातड यांची भेट घेवून समाज कल्याण विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी दिवा प्रज्वलीत केला.
‘सेवा संकल्प अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘आशीर्वादाचा दिवा’ या उपक्रमांतर्गत समाज कल्याण विभागाच्या योजनांचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांच्या घरी जाऊन दिवा प्रज्वलित करणे व लाभार्थ्यांच्या भेटी घेणे हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत अमरावतीच्या केवल कॉलनी येथील रहिवासी असलेले समाज कल्याण विभागाच्या राजर्षी शाहु महाराज परदेश शिष्यवृत्तीचे लाभार्थी विकास तातड यांच्या निवासस्थानी समाज कल्याण विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त माया केदार, सहायक आयुक्त राजेंद्र जाधवर यांच्यासह अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सदिच्छा भेट दिली.
या भेटी दरम्यान, विकास तातड यांनी आपल्या संघर्षमय शैक्षणिक प्रवासाची व सामाजिक कार्यातील वाटचालीची माहिती दिली. त्यांच्या वडिलांची छोटीशी चहाची टपरी होती. वडिलांना कामात मदत करतानाच त्यांनी शालेय शिक्षणापासून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षणाची जिद्द कायम ठेवत त्यांनी पुढील शिक्षणासाठी मुंबईतील टाटा सामाजिक विज्ञान संस्थान (टीआयएसएस) येथे प्रवेश घेतला. तिथे त्यांनी विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला.
दरम्यान, त्यांचा संशोधन निबंध अमेरिकेतील मँचेस्टर विद्यापीठात येथे निवडला गेला. २०१८ मध्ये त्यांनी प्रथमच अमेरिकेला जाऊन संशोधन निबंधाचे सादरीकरण केले. याच दौऱ्यात त्यांनी कोलंबिया विद्यापीठाला भेट दिली. तेथील शैक्षणिक वातावरण आणि सामाजिक दृष्टिकोणाने प्रभावित होऊन भविष्यात याच विद्यापीठात उच्च शिक्षण घेण्याचा निर्धार त्यांनी केला.त्यांच्या या स्वप्नाला पुढे यश मिळाले. २०२२ मध्ये कोलंबिया विद्यापीठामधील ‘इंटरनॅशनल अँड कंप्यारेटिव्ह एज्युकेशन’ या विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी त्यांची निवड झाली.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती २०२२-२३ च्या माध्यमातून त्यांनी अमेरिकेत उच्च शिक्षण पूर्ण केले. शिक्षणासोबतच सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी अमेरिकेतही विविध सामाजिक विषयांवर काम केले. सामाजिक न्याय, विद्यार्थ्यांचे प्रश्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार तसेच विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी त्यांनी विविध उपक्रमांमध्ये सहभाग घेतला. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत न्यू जर्सी येथील महानगरपालिकेच्या महापौरांकडून त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
सध्या विकास तातड हे ‘क्षमता बांधणी’ क्षेत्रात तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. परदेशातील उच्च शिक्षणानंतरही अमरावतीशी असलेले आपले नाते त्यांनी कायम ठेवले आहे. त्यांनी सिद्धार्थ नगर येथे ‘स्लम स्कूल’ची स्थापना करून आर्थिकदृष्ट्या वंचित विद्यार्थ्यांना अल्प खर्चात गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्याचा उपक्रम सुरू केला आहे.
या शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांना समाज कल्याण विभाग, अमरावतीकडून वेळोवेळी मिळालेल्या सहकार्याबद्दल त्यांनी विशेष आभार व्यक्त केले. समाज कल्याण विभागाच्या सहकार्यामुळे सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांना बळ मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी समाज कल्याण विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विकास तातड यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. समाज कल्याण विभागाच्या आयुक्त दिपा (मुधोळ) मुंडे यांनी व्हिडीओ कॉलद्वारे विकास तातड यांच्याशी संवाद साधला व त्यांच्या संघर्षमय प्रवासाची माहिती घेतली.
पुढील शैक्षणिक ध्येयाबाबत बोलताना विकास तातड यांनी कोलंबिया विद्यापीठातून येथे पीएचडी करण्याची इच्छा व्यक्त केली. चहाच्या टपरीवरील संघर्षातून सुरू झालेला प्रवास, टिस ते अमेरिकेतील उच्च शिक्षण आणि सामाजिक कार्यापर्यंत पोहोचलेली त्यांची वाटचाल ही अमरावतीतील विद्यार्थी व तरुणांसाठी शिक्षण, जिद्द आणि सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी आदर्श ठरत आहे.