अमरावती, दि.९ सप्टेंबर २०२६ : गणेशोत्सवासह सर्व सण-उत्सव पर्यावरणपूरक व ध्वनीप्रदूषणमुक्त पद्धतीने साजरे व्हावेत, अमरावती जिल्हा उच्च क्षमतेच्या डॉल्बी-डीजे व कर्णकर्कश ध्वनीयंत्रणांच्या दणदणाटातून मुक्त करावा, तसेच विद्यानंद बापट यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, या मागण्यांसाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व समविचारी संघटनांच्या वतीने आज निवेदन देण्यात आले.
हे निवेदन पोलीस आयुक्त, अमरावती शहर व पोलीस अधीक्षक, अमरावती ग्रामीण यांना देण्यात आले. तसेच जिल्हाधिकारी, अमरावती यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री यांनाही निवेदन सादर करण्यात आले.
गणेशोत्सव व विविध मिरवणुकांमध्ये मोठ्या क्षमतेच्या डॉल्बी-डीजे, प्रेशरमिड व तत्सम ध्वनीयंत्रणांमुळे होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाचा लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण, विद्यार्थी, कामगार तसेच प्राणी-पक्ष्यांना त्रास होतो. त्यामुळे संबंधित कायदे व न्यायालयीन निर्देशांची काटेकोर अंमलबजावणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
यासोबतच विद्यानंद बापट यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला. हल्ल्याची सखोल व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि सामाजिक प्रबोधन व वैज्ञानिक दृष्टिकोनासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना आवश्यक संरक्षण द्यावे, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी जिल्हा प्रधान विजय डवरे यांच्यासह नरेंद्र धर्माळे, दिलीप लाडे, प्रतिभा खापरे, बबिता वानखडे, वैशाली वाघ, संजय खापरे, सचिन वासनिक, दिनेश वानखडे तसेच विविध शाखांचे प्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
“उत्सव साजरा करूया, पण पर्यावरण व नागरिकांच्या शांततेची किंमत मोजून नाही” या भूमिकेतून अमरावती जिल्हा ध्वनीप्रदूषणमुक्त करण्यासाठी प्रशासनाने ठोस व प्रभावी पावले उचलावीत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.