वाघाने २२ वर्षीय उर्मिलाचा बळी घेतला, २ बकर्या,१ गाय ठार , तालुक्यात वाघाची दहशत कायम
शिरजगाव कसबा/चांदुर बाजार(डिंगाबर सुने)
दिनांक ७
(ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क)
--तालुक्यातील सोनोरी, देऊरवाडा परिसरातील वाघाची भ्रमंती सुरू असून त्याने उर्मिला बाजीराव इवाने या २२ वर्षीय सोनोरी येथील मुलीचा बळी घेतला आहे.नंदकिशोर मडघे यांच्या शेताजवळ गुराखी बकर्या चारत असतांना वाघाने अचानक हल्ला करून २ बकर्या ठार केल्या व काही जखमी केल्याची घटना रविवारी दुपारी तर देऊरवाडा सोमतीर्थ येथे रात्री गाईचा बळी घेतला आहे.
वाघाने गुराख्यावरही हल्ल्याचा प्रयत्न केला असता त्याने कुर्हाडीचे साह्याने परतुनी लावल्याची माहिती आहे.
घटनेची माहिती मिळताच वन अधिकारी, कर्मचारी व ब्राह्मणवाडा पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल होवून चौकशी करित आहे.तसेच वाघाचा शोध घेण्याचा प्रयत्न करित असले तरी वाघाचा शोध न लागल्याने सोनोरी,नानोरी,वणी,जालनापूर,घाटलाडकी,विश्रोळी, ब्राम्हणवाडा थडी परिसरात दशहत पसरली आहे.शेतकरी, शेतमजूर शेतात जाण्याचे टाळत आहे.शेतात कुणीही एकटे जाऊ नये.समुहाने जावे.लहान मुलांना शेतात पाठवू नये.वाघ दिसल्यास त्वरित ब्राम्हणवाडा थडी पोलिस स्टेशनशी संपर्क साधण्याचे आवाहन ठाणेदार प्रशांत जाधव यांनी केले आहे.
दुपारी सोनोरी परिसरात बकऱ्या चारण्यास गेलेली २२वर्षीय उर्मिला बाजीराव ईवने या मुलीचा वाघाने बळी घेतल्यामुळे गावातील नागरिकांनी आक्रमक होऊन वन विभागाच्या काही वाहनाचे नुकसान केले असल्याची माहिती मिळाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी या भागामध्ये सुरक्षास्तव बंदोबस्त वाढविला आहे.
रविवार रात्री शिरजगाव कसबा पोलीस स्टेशन अंतर्गत देऊरवाडा सोमतीर्थ तेथे एका गाईचा बळी घेतला असून दुसऱ्या गाईला जखमी दिले आहे.
शिरजगाव कसबा ठाणेदारांनी शेतकऱ्यांना शेतात एकटे जाऊ नये असे आवाहन केले आहे.
प्रशासनाने हेलिकॉप्टर व ड्रोन द्वारे वाघाचा शोध घ्यावा
रविवारी दिवसभर वाघाने बकऱ्या व मुलीचा बळी घेतला असून रविवारी रात्री देऊरवाडा सोमतीर्थ भागातील गाईचा बळी घेतल्यामुळे चांदूरबाजार तालुक्यातील शेतकरी व नागरिक संतप्त झाले असून मंत्र्याच्या दौरा करिता हेलिकॉप्टर वापरले जाते तर मग नागरिकांचा जनावरांचा बळी घेणाऱ्या वाघाच्या बंदोबस्ता करिता त्याचा शोध घेण्याकरिता हेलिकॉप्टरवर ड्रोन चा वापर प्रशासन का करीत नाही असा संतप्त सवाल शेतकरी व नागरिक करीत आहे.