दि. ७ :-
अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील सोनोरी येथे वाघाच्या हल्ल्यात एका तरुणीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना रविवार, ६ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळच्या सुमारास घडली.
सोनोरी येथील रहिवासी असलेली उर्मिला बाजीराव इवाने (वय १८ वर्षे) ही तरुणी रविवारी सायंकाळी आपल्या आईसोबत गावाजवळील गजानन झळे यांच्या शेतात शेळ्यांसाठी चारा कापण्यासाठी गेली होती. चारा कापत असताना अचानक एक वाघिण त्यांच्या दिशेने झेपावली. समोर मृत्यू उभा असलेला पाहून उर्मिलाची आई जिवाच्या आकांताने गावाच्या दिशेने पळत सुटली.
दरम्यान, वाघिण अगदी जवळ आल्यामुळे स्वतःचा जीव वाचवण्यासाठी उर्मिलाने तातडीने एका झाडावर चढण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती झाडावर चढत असतानाच वाघिणीने तिच्यावर झडप घातली आणि तिला खाली ओढून सुमारे १५ ते २० फूट झुडपांमध्ये फरफटत नेले, ज्यामुळे उर्मिलाचा जागीच मृत्यू झाला.
उर्मिलाच्या आईने धावत जाऊन गावात ही माहिती दिली. त्यानंतर गावातील नागरिक मोठ्या संख्येने लाठ्या-काठ्या घेऊन शेताकडे धावले. गावकऱ्यांनी एकत्र येऊन मोठा आरडाओरड केल्यामुळे वाघिण उर्मिलाचा मृतदेह सोडून जंगलाच्या दिशेने पसार झाली.
या घटनेमुळे सोनोरी आणि परिसरातील गावकऱ्यांमध्ये वनविभागाविरोधात तीव्र संताप निर्माण झाला. गेल्या काही दिवसांपासून परिसरात वाघाची दहशत असतानाही वनविभागाने ठोस पावले उचलली नाहीत, असा आरोप गावकऱ्यांनी केला. संतप्त गावकऱ्यांनी घटनास्थळी दाखल झालेल्या वनविभागाच्या वाहनावर दगडफेक करत काचा फोडल्या. परिस्थिती तणावपूर्ण बनल्यामुळे गावात काही काळ भीतीचे आणि दहशतीचे वातावरण होते.
वनविभागाच्या माहितीनुसार, ही तीच वाघिण आहे जिने २७ ऑगस्ट २०२६ रोजी मोर्शी तालुक्यातील भांबोरा येथे चरणदास इखे या ५२ वर्षीय शेतकऱ्याचा बळी घेतला होता. तिथून सुमारे ५० किलोमीटरचा प्रवास करत ही वाघिण चांदूर बाजार तालुक्यात दाखल झाली आहे. सोनोरी गावात तिने मानवी बळी घेण्यापूर्वी दोन शेळ्यांची शिकार केल्याची माहितीही समोर आली आहे.
या नरभक्षक वाघिणीला पकडण्यासाठी वनविभागाचे पथक, ड्रोन, ट्रॅप कॅमेरे आणि पिंजरे लावून शोधमोहीम राबवत आहे. परिसरात वाघाचा संचार कायम असल्याने वनविभागाने शेतकऱ्यांना आणि गावकऱ्यांना शेतात जाताना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.