*अण्णाभाऊ: परिवर्तनाचे अशोकचक्र...... डॉ. सतीश तराळ*
अमरावती दि. ६ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे बहुप्रसवा प्रतिभेचे धनी, शब्दप्रभू व शैलीकार होते. ते सामाजिक व साहित्यिक क्रांतिकारक असून परिवर्तनाचे अशोक चक्र होते. लोककला व लोकपरंपरांचा वारसा लाभलेले लोककलावंत ,'रायटर ऑफ मासेस्' व अक्षरवाङ्मयाचे निर्माते होते. चाळीस कादंबऱ्या व तेरा कथासंग्रहांमधून त्यांनी उपेक्षितांचे अंतरंग व भावविश्व रेखाटले. ते दलित कथेचे शिल्पकार व लोकनाट्याचे जनक होते. मार्कसवाद आणि आंबेडकर वादाचा अद्भुत संगम त्यांच्या विचारसरणीत होता. अशा आशयाचे उद्गार डॉ. सतीश तळ यांनी काढले.ते महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती अमरावती जिल्हा व शहर शाखेच्या वतीने आयोजित लोकशाहीत अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव व पाक्षिक सभेच्या निमित्ताने समारंभाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते.
गुरुदेव सेवाश्रम ट्रस्ट राधानगरर येथे उत्साहपूर्ण आणि विचारमंथनात्मक वातावरणात सभा संपन्न झाली. . राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा कार्याध्यक्ष प्रफुल्ल मंदा श्रीधर, ज्येष्ठ कार्यकर्ते लक्ष्मण तडस आणि नरेंद्र धर्माळे उपस्थित होते.
सभेच्या प्रारंभी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. त्यांच्या समता, बंधुता, श्रमिकांच्या हक्कांसाठीचा संघर्ष, जातिविहीन समाजरचना आणि विवेकनिष्ठ विचारांचा आढावा घेण्यात आला. उपस्थितांनी घोषणांच्या माध्यमातून अण्णाभाऊंना अभिवादन करत त्यांच्या विचारांचा समाजात व्यापक प्रसार करण्याचा संकल्प केला.
यानंतर जिल्हा कार्यकारिणी बैठकीतील निर्णय, विविध शाखांचे अहवाल, संघटनात्मक वाटचाल आणि आगामी उपक्रमांचे सविस्तर वाचन करण्यात आले. जिल्हा व शहर शाखेने राबविलेल्या प्रबोधनात्मक, वैज्ञानिक आणि जनजागृती उपक्रमांचा आढावा घेऊन आगामी कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले.
बैठकीत महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा आणि काळी जादू प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, अंधश्रद्धाविरोधी मोहिमा अधिक व्यापक करणे, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार करणे आणि विवेकवादी विचार गावागावात पोहोचविणे याबाबत ठोस भूमिका घेण्यात आली.
संघटन विस्ताराला गती देण्यासाठी नवीन शाखा स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच दि. ९ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२.३० वाजता गुरुदेव सेवाश्रम ट्रस्ट राधानगर येथे "तुकडोजी महाराज आणि अंधश्रद्धा निर्मूलन" या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. याशिवाय बुवाबाजी विरोधी संघर्ष परिषद, लेखन-वाचन कार्यशाळा, विवेकवादी जनजागृती अभियान आणि विविध सामाजिक उपक्रमांचे नियोजन सर्वानुमते निश्चित करण्यात आले.
यावेळी राहुल खंडारे आणि प्रवीण वासनिक यांनी अंनिसचे नवीन अंक लावले. तसेच अधिकाधिक कार्यकर्त्यांनी अंनिसचे नियमित वर्गणीदार होऊन विवेकवादी विचार प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
उपस्थित वक्त्यांनी अंधश्रद्धा, बुवाबाजी आणि अवैज्ञानिक प्रथांविरोधातील लढा अधिक प्रभावी करण्यासाठी प्रत्येक गावात संघटन बळकट करण्याचे आवाहन केले. "वैज्ञानिक दृष्टिकोन, विवेकवाद आणि मानवता" या मूल्यांवर आधारित समाजनिर्मितीसाठी संघटित प्रयत्नांची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सभेच्या यशस्वी आयोजनासाठी विविध उपक्रम विभागाचे जिल्हा कार्यवाह आशिष देशमुख यांनी विशेष संपर्क व समन्वय साधला. कार्यक्रमाचे प्रभावी संचालन दिलीप लाडे यांनी केले, तर पल्लवी ढोले यांनी आभार प्रदर्शन केले. शेवटी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे गीत सादर करण्यात आले.
या प्रसंगी विजय डवरे (जिल्हा प्रधान सचिव), सचिन खोब्रागडे, दिगंबर मेश्राम, सचिन वासनिक, पल्लवी ढोले, बबिता वानखडे, नरेंद्र धर्माळे, राहुल खंडारे यांच्यासह जिल्हा व शहर शाखेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेच्या अखेरीस वाशीम जिल्ह्याचे माजी कार्याध्यक्ष पी. एस. खंदारे यांच्या दीर्घ आजाराने झालेल्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यात आला. उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली.
"विवेकाचा आवाज बुलंद करूया!"
"अंधश्रद्धा हटवा – विवेक वाढवा!"
"वैज्ञानिक दृष्टिकोन – मानवतेचा पाया!"
या प्रेरणादायी घोषणांनी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या समतावादी, मानवतावादी व विवेकनिष्ठ विचारांचा वारसा समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त करत पाक्षिक सभेचा समारोप झाला.