शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी अमरावती तालुक्यातील शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरणाचे आवाहन


 

          अमरावती, दि. ६ :  पुण्यश्लोक अहिल्यादेवी  होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना2026  अंतर्गत अमरावती तालुक्यातील शेतकऱ्यांच्या गावपातळीवर प्रसिद्ध झालेल्या याद्या आणि योजनेच्या पोर्टलवरील रकमेत असलेल्या फरकाबाबत संभ्रम निर्माण करू नये व कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नये सर्व पात्र शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ होणार आहे. तसेच, शेतकऱ्यांना  पोर्टलवरील माहिती तपासून आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन, उपविभागीय अधिकारी अनिलकुमार भटकर, तहसीलदार विजय लोखंडे व सहकारी संस्था उपनिबंधक सुधीर खंबायत  यांनी केले आहे.

गावपातळीवर प्रसिद्ध झालेल्या यादीतील शेतकऱ्यांच्या थकबाकी रकमेतील फरक आणि योजनेच्या पोर्टलवरील थकबाकी रकमेतील भिन्नता असल्यास पोर्टलवरील रक्कमच निर्णायक मानली जाणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पोर्टलवर दर्शवलेली कर्जाची थकबाकी रक्कम  31 मार्च 2026 ची आहे. शासनाने  1 जुलै 2026 च्या पत्राद्वारे सर्व बँकांना 1 एप्रिल 2026 नंतरचे व्याज वसूल न करण्याचे निर्देश दिले आहेत आणि सर्व बँकांनी हे मान्य केले आहे. त्यानुसार शेतकऱ्यांनी पोर्टलवर आपली नोंदणी व थकबाकी रक्कम तपासून आधार प्रमाणीकरण करावे. आधार प्रमाणीकरण केल्यानंतर यशस्वी झाल्याची पावती मिळेल ज्यात कर्जमुक्ती होणारी रक्कम प्रदर्शित असेल. आधार प्रमाणीकरणानंतर 31 मार्च 2026 वरील कर्जबाकीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात डिबिटीद्वारे जमा केली जाईल आणि त्यानंतर कर्ज बेबाकी प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांना संबंधित बँकेच्या शाखेत व कार्यकारी सेवा संस्थांमध्ये  याद्या लावण्यात येतील. कर्जमाफी मिळाल्यानंतर खरीप पीक कर्ज उपलब्ध होणार आहे. पोर्टलवरील रक्कम किंवा इतर कोणताही तपशील शेतकऱ्यांसाठी अमान्य वाटल्यास त्यांनी पोर्टलवर तक्रार  नोंदविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तक्रारींचे निराकरण जिल्हाधिकारी  यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीद्वारे करण्यात येणार आहे. सेतू संचालक व सीएससी केंद्रांच्या प्रमुखाने संबंधीत शेतकऱ्यांना  संपर्क करून आधार प्रमाणीकरण करण्यात मदत करावी असे सांगण्यात आले आहे. आधार प्रमाणीकरण आणि ॲग्रीस्टॅक नोंदणी शिवाय कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. असे स्पष्ट करण्यात आले आहे.

अमरावती तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांची यादी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये,सेवा सहकारी संस्था, सर्व आपले सरकार सेवा केंद्र, सीएससी केंद्र आणि  sdo.amravati.nic. संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्याचे अमरावती उपविभागीय कार्यालयाकडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

                                                          

Post a Comment

0 Comments