दि. १५ पंढरपूर :-(ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क)
आषाढी यात्रेच्या (Ashadhi Ekadashi 2026) पार्श्वभूमीवर पंढरपूर शहर आणि आसपासच्या परिसरात आज, १५ जुलै ते २९ जुलै २०२६ या १५ दिवसांच्या कालावधीसाठी मांस, मटण आणि चिकन विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
इतिहासामध्ये पहिल्यांदाच सलग १५ दिवस एवढ्या मोठ्या कालावधीसाठी हा कडक निर्णय घेण्यात आला आहे.
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे
उपविभागीय दंडाधिकारी (SDM) सचिन इथापे
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या निर्देशानंतर उपविभागीय दंडाधिकारी (SDM) सचिन इथापे यांनी हा अधिकृत आदेश जारी केला आहे.
हा बंदी आदेश भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ (२) अन्वये कायदेशीर रित्या लागू करण्यात आला आहे.
पंढरपूर शहरातील चिकन, मटण, मासे विक्रीची दुकाने आणि संपूर्ण मच्छी मार्केट पूर्णपणे बंद राहतील.
प्राणी कत्तलखाना तसेच कोणत्याही प्रकारचे मांसजन्य पदार्थ विकण्यास सक्त मनाई असेल.
पंढरपूर शहरासह आसपासच्या ग्रामीण भागातील करकंब, पांढरेवाडी, व्होळे, देवडे, खेडभोसे या पालखी मुक्कामाच्या गावांमध्येही २० ते २५ जुलै दरम्यान ही बंदी लागू असेल.
धार्मिक भावनांचे रक्षण: २५ जुलै रोजी साजरी होणाऱ्या आषाढी एकादशीसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी पंढरीत दाखल होत आहेत. वारकरी संप्रदायात मांसाहार वर्ज्य मानला जातो. वारीच्या पवित्र काळात कुठेही मांसविक्री सुरू राहिल्यास भाविकांच्या धार्मिक भावना दुखावू नयेत, यासाठी विविध सामाजिक व राजकीय संघटनांनी ही मागणी केली होती.
शहरात धार्मिक पवित्रता आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे.