24 जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
अमरावती, दि.१५ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्यादित, अमरावती मार्फत जिल्ह्यातील मातंग समाज व तत्सम बारा पोटजातींमधील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी महत्त्वाचा पाऊल उचलण्यात आले आहे. यानुसार, सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी विशेष प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती योजना जाहीर करण्यात आली आहे. प्रस्ताव सादर करण्याची मुदत 24 जुलै पर्यंत आहे.
या योजनेंतर्गत ज्या गरजू विद्यार्थ्यांनी नुकत्याच झालेल्या इयत्ता 10 वी, 12 वी, पदवी, पदव्युत्तर तसेच वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या परीक्षांमध्ये सरासरी 60 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त केले आहेत, अशा गुणवंत विद्यार्थ्यांना निधीच्या उपलब्धतेनुसार आणि गुणक्रमानुसार जिल्ह्यातील प्रथम 3 ते 5 विद्यार्थ्यांची निवड करून ही शिष्यवृत्ती मंजूर केली जाणार आहे. या संधीचा लाभ घेण्यासाठी पात्र व गरजू विद्यार्थ्यांनी महामंडळाने विहित केलेली सर्व आवश्यक कागदपत्रे, ज्यामध्ये जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड, संबंधित परीक्षेची गुणपत्रिका, बोनाफाईड प्रमाणपत्र, दोन पासपोर्ट साईझ फोटो आणि आधार कार्ड यांचा समावेश आहे, या सर्व कागदपत्रांसह आपले परिपूर्ण प्रस्ताव 24 जुलै 2026 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करणे बंधनकारक आहे.
सर्व पात्र विद्यार्थ्यांनी आपले अर्ज ‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्यादित, सामाजिक न्याय भवन, पोलीस कमिशनर कार्यालयाच्या मागे, अमरावती’ या पत्त्यावर वेळेत सादर करावे, जेणेकरून मातंग समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल परंतु अभ्यासात हुशार असलेल्या विद्यार्थ्यांना या आर्थिक साहाय्याचा लाभ मिळून त्यांच्या पुढील उच्च शिक्षणाचा मार्ग अधिक सुकर होईल, असे आवाहन महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक श्रीमती एम. टी. खडसे यांनी केले आहे.