अमरावतीसह 21 जिल्ह्यांत अंमलबजावणी
अमरावती, दि. १५ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (टप्पा-२) अंतर्गत राज्यातील 21 जिल्ह्यांमधील 7 हजार 201 गावांमधील अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती आणि सर्व महिला शेतकऱ्यांना ठिबक व तुषार सिंचनाचे अनुदान आता 'सेंट्रल बँक डिजिटल चलन' (सीबीडीसी) या डिजिटल प्रणालीद्वारे थेट वितरित करण्यात येणार आहे. नाशिक, नागपूर आणि चंद्रपूर येथील यशस्वी प्रयोगानंतर आता अमरावतीसह सर्व प्रकल्प जिल्ह्यांत ही पद्धत लागू झाली आहे.
जागतिक बँकेच्या अर्थसाहाय्याने चालणाऱ्या या प्रकल्पात पूर्वी लागू असलेल्या 'बॅक-एंडेड सबसिडी' पद्धतीमुळे शेतकऱ्यांना सुरुवातीला स्वतःच्या खिशातून पूर्ण रक्कम खर्च करून सिंचन संच खरेदी करावा लागायचा. भांडवलाअभावी अनेक अल्पभूधारक शेतकरी या योजनेपासून वंचित राहायचे. ही अडचण दूर करण्यासाठी शासनाने 'सीबीडीसी' आधारित फ्रंट एंडेड प्रणाली लागू केली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांवर सुरुवातीला पैसे उभारण्याचा ताण पडणार नाही.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी डीबीटी पोर्टलवर अर्ज करताना 'P-CBDC' हा पर्याय निवडून 'PNB Digital Rupee App' डाऊनलोड करायचे आहे. पूर्वसंमती मिळताच शेतकऱ्यांच्या डिजिटल वॉलेटमध्ये अनुदानाच्या रकमेइतके डिजिटल टोकन जमा होतील. हे टोकन अधिकृत विक्रेत्याकडे क्यूआर कोडद्वारे स्कॅन करून वापरता येतील. शेतकऱ्यांना केवळ उर्वरित रक्कम भरून संच खरेदी करता येईल आणि यासाठी बँकेत स्वतंत्र खाते उघडण्याची गरज नाही. प्रत्यक्ष पडताळणी पूर्ण झाल्यावर अनुदानाची अंतिम रक्कम विक्रेत्याच्या खात्यात जमा केली जाईल. ही सुरक्षित व पारदर्शक डिजिटल प्रणाली सूक्ष्म सिंचनाचा प्रसार वेगाने वाढवणारी ठरणार असून, पात्र लाभार्थ्यांनी याचा लाभ घेण्यासाठी जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अर्चना निस्ताने यांनी केले आहे.