महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची पाक्षिक सभा उत्साहात संपन्न - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Monday, July 13, 2026

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची पाक्षिक सभा उत्साहात संपन्न


अंधश्रद्धा निर्मूलन, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार व संघटन विस्तारावर भर


अमरावती, दि. १३ जुलै २०२६ : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, अमरावती जिल्हा व शहर शाखेची पाक्षिक सभा गुरुदेव सेवाश्रम, राधा नगर येथे उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध आणि विचारमंथनात्मक वातावरणात संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हाउपाध्यक्ष डॉ. सतीश तराळ होते. राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार यांनी मार्गदर्शन केले. प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हाउपाध्यक्ष प्रमोद कोळमकर, संविधान जागर विभागाचे राजीव बसवनाथे, तसेच ज्येष्ठ कार्यकर्ते लक्ष्मण तडस आणि नरेंद्र धर्माळे उपस्थित होते.

सभेच्या प्रारंभी विस्तारित जिल्हा कार्यकारिणी बैठकीतील निर्णय, विविध शाखांचे अहवाल, संघटनात्मक वाटचाल आणि आगामी उपक्रमांची दिशा यांचे सविस्तर वाचन करण्यात आले. त्यानंतर जिल्हा व शहर शाखेने राबविलेल्या विविध सामाजिक, प्रबोधनात्मक आणि जनजागृती उपक्रमांचा आढावा घेऊन आगामी कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले.

बैठकीत महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा आणि काळी जादू प्रतिबंधक कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशासनाशी समन्वय वाढविणे, अंधश्रद्धाविरोधी मोहिमा अधिक व्यापक स्वरूपात राबविणे, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार करणे आणि विवेकवादी विचार गावागावात पोहोचविणे याबाबत ठोस भूमिका घेण्यात आली.

यासोबतच नवीन शाखा स्थापन करून संघटन विस्ताराला गती देणे, ९ ऑगस्ट रोजी गुरुदेव सेवाश्रम येथे "तुकडोजी महाराज आणि अंधश्रद्धा निर्मूलन" या विषयावर परिसंवाद आयोजित करणे, बुवाबाजी विरोधी संघर्ष परिषद, लेखन-वाचन कार्यशाळा तसेच विविध जनजागृती उपक्रमांचे नियोजन करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.

यावेळी अमरावती शहर शाखेचे नवनियुक्त अध्यक्ष मिलिंद तायडे यांचा अनिप वार्तापत्र प्रदान करून सत्कार करण्यात आला. तसेच अनिप वार्तापत्राच्या पाच वर्षांच्या यशस्वी प्रवासानिमित्त दोन नवीन वर्गणीदार नोंदविण्यात आले. आगामी काळात वार्तापत्राचे अधिकाधिक वर्गणीदार करून विवेकवादी विचार समाजापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

उपस्थित वक्त्यांनी अंधश्रद्धा, बुवाबाजी आणि अवैज्ञानिक प्रथांविरोधातील लढा अधिक व्यापक करण्यासाठी प्रत्येक गावात संघटन बळकट करण्याचे आवाहन केले. "वैज्ञानिक दृष्टिकोन, विवेकवाद आणि मानवता" या मूल्यांवर आधारित समाजनिर्मितीसाठी सर्व कार्यकर्त्यांनी संघटितपणे कार्य करण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली.

सभेच्या यशस्वी आयोजनासाठी विविध उपक्रम विभागाचे जिल्हा कार्यवाह आशिष देशमुख यांनी विशेष संपर्क व समन्वय साधला. कार्यक्रमाचे प्रभावी संचालन मंजू वासनिक यांनी केले, तर सचिन खोब्रागडे यांनी आभार प्रदर्शन केले. शेवटी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे गीत सादर करण्यात आले.

या प्रसंगी अफसरभाई (जिल्हा कार्यवाह, बुवाबाजी संघर्ष विभाग), प्रफुल्ल मंदा श्रीधर, विजय डवरे, सचिन खोब्रागडे, मंजू वासनिक, दिलीप लाडे, मनीष गणेशपुरे, दिगंबर मेश्राम, विजया करोले, सुरज मंडे, मिलिंद तायडे, बबिता वानखडे, नरेंद्र धर्माळे, राजीव बसवनाथे, संदीप हिवराळे, प्रमोद कोळमकर यांच्यासह जिल्हा व शहर शाखेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

"विवेकाचा आवाज बुलंद करूया!"
"अंधश्रद्धा हटवा – विवेक वाढवा!"
"वैज्ञानिक दृष्टिकोन – मानवतेचा पाया!"


या प्रेरणादायी घोषणांनी पाक्षिक सभेचा उत्साहपूर्ण समारोप झाला.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages