अमरावती, दि. २५ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : भारतीय रिझर्व्ह बँकेने मान्यता दिलेल्या मायक्रोफायनान्स इंडस्ट्री नेटवर्क या राष्ट्रीय स्वयं-नियामक संस्थेच्या वतीने अंबा मंगलम येथे आर्थिक साक्षरता व जनजागृती कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात महिला कर्जदारांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.
उद्घाटनाला आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण वागणे, नाबार्डच्या जिल्हा विकास व्यवस्थापक रश्मिता पांचाळ, अग्रणी बँक व्यवस्थापक नरेश हेडाऊ, आरसेटी संचालक निखिल भस्मे, निवृत्त पोलिस निरीक्षक श्री. कोल्हे, एमएफआयएन प्रादेशिक प्रमुख देवेंद्र शहापूरकर उपस्थित होते.
श्री. वागणे यांनी वाढत्या सायबर व आर्थिक गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी मोबाईल, आधार, पॅन किंवा ओटीपीची माहिती कोणाशीही शेअर करू नये. फसवणूक झाल्यास तात्काळ राष्ट्रीय सायबर हेल्पलाइन १९३० वर किंवा एमएफआयएनच्या टोल-फ्री क्रमांक १८००-१०२-१०८० वर संपर्क साधावा, असे आवाहन केले.
श्रीमती पांचाळ यांनी कर्ज घेण्यापूर्वी कुटुंबाचे उत्पन्न आणि परतफेडीची क्षमता लक्षात घेऊन नियोजन करावे. कर्जमाफीच्या अफवांवर किंवा दिशाभूल करणाऱ्या प्रचारावर विश्वास ठेवल्यास क्रेडिट स्कोअर खराब होऊन भविष्यात कर्ज मिळणे कठीण होत असल्याचे सांगितले.
श्री. हेडाऊ यांनी दुर्गम आणि वंचित घटकांपर्यंत बँकिंग सेवा पोहोचवण्यात मायक्रोफायनान्स संस्थांचे मोलाचे योगदान असल्याचे सांगितले. श्री. भस्मे यांनी वेळेवर कर्ज परतफेडीचे महत्त्व सांगून त्यांनी एमएफआयएनने असे उपक्रम तालुका व ब्लॉक स्तरावरही राबवावेत, अशी सूचना केली. श्री. कोल्हे यांनी मोबाईलच्या सुरक्षित वापराबाबत मार्गदर्शन केले.
श्री. शहापूरकर यांनी अनधिकृत घटकांकडून पसरवल्या जाणाऱ्या दिशाभूल करणाऱ्या माहितीला आळा घालण्यासाठी भविष्यात मेळघाट आणि चिखलदरा भागातही जनजागृती कार्यक्रम आयोजित केले जाणार असल्याचे सांगितले. सदर उपक्रम ॲक्सिस बँक, एयू स्मॉल फायनान्स बँक, भारत फायनान्शियल इन्क्लुजन लि., मुथूट मायक्रोफिन, सतीन क्रेडिटकेअर, स्पंदना स्फूर्ती आणि स्वतंत्र मायक्रोफिन यांच्या सहकार्याने पार पडला.