*नियोजन भवनात दुपारी 12 वाजता जनसुनावणी
अमरावती, दि. २ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर या महिला जन सुनावणी घेणे, महिलाभिमुख उपक्रमांचा आढावा घेणे, संस्थात्मक यंत्रणा बळकट करणे आणि महिलांची सुरक्षा व सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या प्रमुख भागधारकांशी संवाद साधणे यासाठी दि. 3 जुलै रोजी अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. दरम्यान श्रीमती रहाटकर दुपारी 12 वाजता जनसुनावणी घेणार आहे.
श्रीमती रहाटकर यांच्या दि. 3 जुलै रोजी होणाऱ्या दौऱ्यामध्ये विविध महत्त्वपूर्ण कार्यक्रमांचा समावेश राहणार आहे. या दौऱ्याची सुरुवात कार्यस्थळे अधिक सुरक्षित आणि सर्वसमावेशक बनवण्याच्या दृष्टीने आयोजित 'पॉश'-लैंगिक छळ प्रतिबंध प्रशिक्षण कार्यशाळेने होईल. तसेच श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयातील 'यशोदा एआय' कार्यक्रमातही उपस्थित राहणार आहे. नवे तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रामध्ये महिलांची जागरूकता आणि सहभाग वाढवण्यास प्रोत्साहन दिले जाईल.
श्रीमती विजया रहाटकर अमरावती विभागातील वरिष्ठ प्रशासकीय आणि पोलीस अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतील. या बैठकीत महिला कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी, कायदा व सुव्यवस्था यंत्रणा आणि महिलांची सुरक्षा व सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठीच्या उपाययोजनांचे मूल्यमापन केले जाईल. याव्यतिरिक्त, त्या दि. 3 जुलै रोजी दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे 'महिला जन सुनावणी' घेतील. यात पूर्वनोंदणीशिवाय थेट येणाऱ्या तक्रारी देखील स्वीकारल्या जातील. यामुळे महिलांना त्यांच्या समस्या थेट आयोगासमोर मांडण्याची संधी उपलब्ध होणार आहे. यामुळे त्यावर वेळेत हस्तक्षेप आणि निवारण करणे शक्य होईल. संबंधित क्षेत्रातील महिलांचे हक्क आणि कल्याणासाठीच्या सहकार्यात्मक प्रयत्नांवर चर्चा करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींसोबत होणाऱ्या बैठकीने या दौऱ्याची सांगता होईल.