ड्रोन प्रात्यक्षिक पाहताना जिल्हा परिषद सीईओ सत्यम गांधी
ड्रोन दीदींचे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रात्यक्षिक
शिरजगाव कसबा, दिनांक १७(ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) :
ग्रामीण भागातील महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी आणि शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यासाठी कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था तसेच म्युनिक री यांच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ड्रोन दीदी प्रकल्पातून महिलांना मोठा आधार मिळत आहे. येथे मान्यवरांच्या उपस्थितीत ड्रोनचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले आहे.
कल्पना विनोद वानखडे, या अमरावती जिल्ह्यातील पहिल्या महिला 'ड्रोन पायलट' आहेत. समर्थ महिला समूहाच्या त्या सदस्य आहेत. ड्रोन व्यवसाय करीत असताना अनेक अडचणी येत होत्या. शासन योजनेतून अतिरिक्त बॅटरी संच, ड्रोन वाहतुकीसाठी वाहन, को-पायलटची सोय तरतूद नसणे, स्थानिक स्तरावर स्पेअर पार्ट्स व सर्व्हिस सेंटरचा अभाव तसेच ड्रोन देखभाल व दुरुस्तीबाबत मर्यादित तांत्रिक ज्ञान या कारणामुळे त्यांचा व्यवसाय अडचणीत आला होता.
यावर पार्श्वभूमीवर कृषी विकास संस्थेने पुढाकार घेत अशा अडचणीत असलेल्या ड्रोन दीदींची ओळख पटवली. त्यानंतर ३ दिवसांचा निवासी दुरुस्ती व देखभाल प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या प्रशिक्षणामध्ये ड्रोन दीदींसोबत त्यांच्या को-पायलटलाही प्रशिक्षण देण्यात आले. तसेच आवश्यक ड्रोन स्पेअर पार्ट्स व ॲक्सेसरिज, अतिरिक्त तीन बॅटरी संच आणि ड्रोन वाहतुकीसाठी वाहन उपलब्ध करून देण्यात आले. या सहकार्यामुळे कल्पना वानखडे व त्यांच्या स्वयंसहायता गटाला नवसंजीवनी मिळाली असून त्यांच्या व्यवसायात लक्षणीय वाढ झाली आहे. या उपक्रमात
शिरजगाव कसबा : ड्रोनची पाहणी करताना सीईओ सत्यम गांधी.
शिरसगाव कसबा येथे ड्रोन फवारणीचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांनी उपस्थित राहून प्रात्यक्षिकाची पाहणी केली व ड्रोन दीदी कल्पना विनोद वानखडे यांच्या सोबत संवाद साधला. चांदूरबाजारचे गटविकास अधिकारी डॉ. नीलेश वानखडे, कृषी विकास कार्यक्रम अधिकारी लक्ष्मीकांत पडन, विस्तार अधिकारी किशोर रामगडे, शिरसगाव कसबा ग्रामपंचायतीचे प्रशासक प्रवीण खंडे, सागर वासनकर, सुभाष तांबे, शिल्पा राठोड, ग्रामविकास अधिकारी सुरेश रेखाते आणि सर्व ग्राम सखी ताई यावेळी उपस्थित होत्या.
बालमुकुंद राठी विद्यालय प्रांगणात प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. शेतकऱ्यांना ड्रोन फवारणीचे फायदे, कार्यपद्धती आणि आधुनिक शेतीतील त्याचे महत्व याबत मार्गदर्शन करण्यात आले. शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाबद्दल उत्सुकता दर्शवून याचा अवलंब करण्याची तयारी दर्शवली आहे.