विद्यावेतनासह मिळणार पुस्तक संच
अमरावती, दि.१६ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी मोफत स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणाची संधी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या अचलपूर येथील 'आदिवासी उमेदवारांकरिता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र' यांच्या वतीने विविध सरकारी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी साडेतीन महिन्यांचे विशेष मोफत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण विनामूल्य असून प्रशिक्षणार्थी उमेदवारांना दरमहा 1 हजार रुपये विद्यावेतन आणि मोफत अभ्यासिकेची सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच, हे साडेतीन महिन्यांचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना पुढील अभ्यासासाठी पुस्तकांचा संचही मोफत दिला जाणार आहे.
या प्रशिक्षण सत्राचा कालावधी 1 ऑगस्ट ते 15 नोव्हेंबर 2026 असा असेल. यासाठी इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज 23 जुलै 2026, सायंकाळी 6 वाजेपर्यंत लालपूल जवळील जयस्तंभ रोड, अचलपूर कॅम्प, परतवाडा येथील कार्यालयात सादर करावे. प्रवेश अर्ज वाटप आज 15 जुलैपासून सुरू झाले आहे. या प्रवेशासाठी अनुसूचित जमाती प्रवर्गातील किमान 10 वी उत्तीर्ण आणि 18 ते 30 वर्षे वयोगटातील उमेदवार पात्र ठरतील. तसेच उमेदवाराचे नाव जिल्हा कौशल्य विकास रोजगार कार्यालयात नोंदणीकृत असणे अनिवार्य आहे.
अर्ज सादर केलेल्या सर्व उमेदवारांची मुलाखत 24 जुलै 2026 रोजी दुपारी 12 वाजता संबंधित कार्यालयात घेतली जाईल. मुलाखतीसाठी उमेदवारांनी स्वतःच्या खर्चाने सर्व मूळ कागदपत्रांसह (शाळा सोडल्याचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र, 10 वीचे गुणपत्रक, पासपोर्ट फोटो, बँक पासबुक व रोजगार नोंदणी कार्ड) उपस्थित राहावे. निवड झालेल्या उमेदवारांची अंतिम यादी त्याच दिवशी सायंकाळी 6 वाजता कार्यालयीन फलकावर प्रसिद्ध केली जाईल. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी 7709432024 किंवा 9359976243 या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.