दिनांक: 15 जुलै 2026
अमरावती, दि. १५ : महाराष्ट्र शासनाच्या उच्चशिक्षण विभागामार्फत संचालित मातोश्री शासकीय आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह, वलगाव रोड, अमरावती येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रवेशाची दुसरी फेरी सुरू झाली आहे. पहिल्या फेरीनंतर कनिष्ठ महाविद्यालयासाठी ६, महाविद्यालयीन पदवी/पदव्युत्तर विभागासाठी १० आणि तंत्रशिक्षण विभागासाठी ५ अशा एकूण २१ जागा रिक्त आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांनी वसतिगृहात प्रवेशासाठी प्रवेश अर्ज सादर करावे, असे आवाहन गृहप्रमुख अनिल तसरे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे सन २०२५-२६ या वर्षातील वार्षिक आर्थिक उत्पन्न रु. १,००,०००/- (अक्षरी : एक लाख रुपये फक्त) किंवा त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. पात्र विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार व सामाजिक आरक्षणाच्या नियमानुसार प्रवेश देण्यात येणार आहे.
प्रवेशित विद्यार्थ्यांना वसतिगृहात निवास व भोजनाची निःशुल्क सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. इच्छुक व गरजू विद्यार्थ्यांनी वसतिगृहाच्या कार्यालयातून सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत विनामूल्य प्रवेश अर्ज प्राप्त करून आवश्यक कागदपत्रांसह तातडीने अर्ज सादर करावेत. रिक्त जागांचा लाभ घेण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी विलंब न करता अर्ज करावेत, असेही वसतिगृह प्रशासनाव्दारे कळविण्यात आले आहे.