अर्ज करण्याचे आवाहन
अमरावती, दि. १५ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गातील नागरिकांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि उच्च शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाच्या बहुजन कल्याण विभागांतर्गत कार्यरत असलेल्या 'महाराष्ट्र इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळा'मार्फत विविध कर्ज योजना राबविण्यात येत आहेत. या महामंडळाद्वारे कृषी संलग्न व इतर व्यवसायांच्या वृद्धीसाठी अत्यंत अल्प व्याजदराने व बिनव्याजी कर्ज वितरित केले जात असून, पात्र इच्छुकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापक व्ही. एस. खोडे यांनी केले आहे.
या अंतर्गत राष्ट्रीयकृत बँकांमार्फत राबविल्या जाणाऱ्या '20% बीज भांडवल योजने'मध्ये कमाल 5 लाख रुपयांपर्यंतच्या प्रकल्पांना मंजुरी दिली जाते, ज्यामध्ये महामंडळाचा हिस्सा 20% असतो व अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्षे असावे लागते.
महामंडळामार्फत थेट राबविल्या जाणाऱ्या 'थेट कर्ज योजने'त छोट्या व्यवसायांसाठी 1 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते; याची नियमित परतफेड 5 वर्षांत केल्यास कोणतेही व्याज आकारले जात नाही. या योजनेसाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपर्यंत असणे आवश्यक आहे.
व्यावसायिक वृद्धीसाठी बँकांमार्फत 1 ते 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज देणारी 'वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना' देखील उपलब्ध असून, नियमित परतफेडीवर महामंडळातर्फे 12% पर्यंत व्याज परतावा थेट लाभार्थ्याला अनुदान स्वरूपात दिला जातो. यासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांपर्यंत असावे.
उच्च शिक्षणासाठी देशांतर्गत व परदेशातील अभ्यासक्रमांसाठी 10 ते 20 लाख रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्ज दिले जाते, ज्यावर नियमित परतफेडीवर 12% व्याज परतावा मिळतो. यासाठी विद्यार्थी 12 वी मध्ये 80% पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण असावा व त्याचे वय 17 ते 30 वर्षे असावे.
तसेच, इतर मागासवर्गीय महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी 'महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना' माविमच्या लोकसंचालित साधन केंद्राच्या मदतीने राबविली जात असून, यात बचत गटांच्या उद्योगांसाठी 5 ते 10 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर 12% व्याज परतावा दिला जातो.
या सर्व योजनांच्या अधिक माहिती व लाभासाठी पात्र नागरिकांनी 'महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, नागपूर' यांचे विभागीय कार्यालय: डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, पोलीस आयुक्तालयामागे, अमरावती (फोन नं. 0721-2661261) येथे किंवा महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर www.msobcfdc.in संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.