अमरावती, दि. १४ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यात जून अखेरीस पेरणी झालेल्या सोयाबीन पिकाची अवस्था सध्या 12 ते 15 दिवसांची असून, गेल्या 5 ते 6 दिवसांपासून पावसाने ओढ दिली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी बांधवांनी घाबरून न जाता, कोणत्याही महागड्या फवारण्या न करण्याचे आवाहन अमरावती प्रादेशिक संशोधन केंद्र ( डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ) मार्फत कळविण्यात आले आहे.
या संवेदनशील काळात जमिनीतील ओलावा टिकवणे आणि मुळांची वाढ चांगली ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जमीन वाफशावर असल्यास शेतकऱ्यांनी उथळ डवरणी व कोळपणी करावी; ज्यामुळे वरचा पापुद्रा फुटून तणांचे नियंत्रण होईल आणि जमिनीतील ओलावा टिकून राहील. संरक्षित सिंचनाची सोय असल्यास व रोपे दुपारी कोमेजू लागल्यास हलके स्प्रिंकलर सिंचन द्यावे. 3-4 दिवसांच्या खंडासाठी टॉनिक किंवा 19:19:19 ची गरज नाही, मात्र पाण्याचा ताण 7 ते 10 दिवसांपेक्षा वाढल्यास 1 टक्के पोटॅशियम नायट्रेट किंवा 19:19:19 ची सकाळी किंवा संध्याकाळी फवारणी करावी. तीव्र ताण व जास्त तापमान असताना तणनाशकांचा वापर टाळावा.
दुसरीकडे, ज्या भागात अत्यल्प पावसामुळे अद्याप पेरणी झालेली नाही, तिथे उशिरात उशिरा 23 जुलैपर्यंत सोयाबीन पेरता येईल. मात्र, यामुळे उत्पादनात 15 ते 20 टक्के घट होऊ शकते. अशा वेळी जे एस 20-34, जे एस 95-60, पिडीकेव्ही अंबा, एमएयूएस 725 यांसारख्या लवकर येणाऱ्या वाणांची निवड करावी. हेक्टरी रोपांची संख्या राखण्यासाठी दोन ओळींत 30 से.मी. अंतर ठेवून, बियाणे दर वाढवावा आणि पेरणी बीबीएफ किंवा पट्टा पद्धतीनेच करावी. सोयाबीनमध्ये तुरीचे आंतरपीक घेणे फायदेशीर ठरेल. जर 25 जुलैपर्यंत पेरणी शक्य झाली नाही, तर शेतकऱ्यांनी सोयाबीनची लागवड न करता सूर्यफूल किंवा मका या पर्यायी पिकांची निवड करावी, असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे.