'मध्ये' काय घडते? पुरवठा सुरळीत करण्यासाठी कर्मचाऱ्यांची धावपळ

 


पावसाळ्यात वीज का जाते?

दि. ३० छत्रपती संभाजीनगर:
पावसाळा सुरू झाला की वीज जाण्याचे प्रमाण वाढते. वीज गेल्यानंतर बहुतांश वेळा महावितरणच्या कर्मचाऱ्यांवर तोंडसुख घेतले जाते. मात्र, वीजपुरवठा का खंडित होतो, वीज जाते आणि पुन्हा येईपर्यंत 'या दरम्यान नक्की काय घडते', याची सविस्तर माहिती महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
पावसाळ्यात वादळी वारे, विजांचा कडकडाट, मुसळधार पाऊस, झाडांच्या फांद्या तुटणे, खांबांवरील इन्सुलेटर उडणे किंवा वीजवाहिन्यांवर झाडे पडणे अशा अनेक कारणांमुळे वीजपुरवठा खंडित होतो.
फीडर 'ट्रिप' म्हणजे काय?
 वीजवाहिनीवर अचानक काही बिघाड झाल्यास उपकेंद्रातील कर्मचारी प्रथम स्वतःच्या सुरक्षेसाठी संपूर्ण वीजपुरवठा बंद (ट्रिप) करतात.
 फीडर 'ट्रिप' झाल्यामुळे मोठा अपघात टळतो आणि वीज यंत्रणा सुरक्षित राहते.
फीडर ट्रिप झाल्यानंतर कर्मचारी प्रत्यक्ष वीजवाहिनीवर जाऊन बिघाड शोधतात. बिघाड सापडल्यानंतर दुरुस्तीचे काम पूर्ण करूनच वीजपुरवठा पूर्ववत केला जातो. ही प्रक्रिया वेळखाऊ आणि जोखमीची असते.
"वीज जाते, काही वेळाने पुन्हा येते, त्या मध्यंतरीच्या काळात एखादा कर्मचारी पावसात, अंधारात स्वतःचा जीव धोक्यात घालून बिघाड शोधत आणि दुरुस्त करत असतो. त्यामुळे नागरिकांनी केवळ दोषारोप न करता या यंत्रणेतील गुंतागुंत आणि कर्मचाऱ्यांचे कष्ट समजून घेणे आवश्यक आहे."
- ज्ञानेश्वर आडे, कार्यकारी अभियंता, महावितरण
अशी करा तक्रार
वीजपुरवठ्याबाबत तक्रार नोंदवण्यासाठी महावितरणचे खालील टोल-फ्री क्रमांक २४ तास उपलब्ध आहेत:
टोल-फ्री क्रमांक: १९१२, १९१२०, १८००-२१२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५.
एसएमएस (SMS) सेवा: ग्राहक आपल्या नोंदणीकृत मोबाईलवरून MSEDCL <space> NOPOWER <space> १२ अंकी ग्राहक क्रमांक लिहून ९९३०३९९३०३ या क्रमांकावर एसएमएस पाठवून तक्रार नोंदवू शकतात.
पावसाळ्यात अशी घ्यायची काळजी
महावितरणने नागरिकांसाठी काही महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
घरात ओलावा असल्यास घरगुती उपकरणे वापरणे टाळावे.
विजेच्या खांबांना, तारांना किंवा अर्थिंग वायरला चुकूनही हात लावू नये.
ओल्या हाताने इलेक्ट्रॉनिक वस्तूंना स्पर्श करू नये.
वीज पडत असताना टीव्ही, फ्रीज यांसारख्या मौल्यवान वस्तूंचे प्लग सॉकेटमधून काढून ठेवावेत.

Post a Comment

0 Comments