व्यक्ती निर्माणातूनच राष्ट्रनिर्मिती शक्य - सुहास हिरेमठ
अमरावती दि. १६ : समाजातील सर्व वर्गांची उन्नती करणे हे सरकारचे काम आहे. समाजातील कोणताही वर्ग मागे राहिला, तर संपूर्ण समाज मागे राहतो आणि दुर्बल बनतो. अशा सर्व घटकांना पुढे येण्यासाठी आधार देण्याचे काम ‘अमृत’ सारख्या संस्था करत आहेत. मात्र, समाजाची उन्नती करत असताना त्यांचे चारित्र्य निर्माण करणे हेही आपले कर्तव्य आहे. व्यक्ती निर्माणातून जेव्हा चारित्र्यनिर्माण होते, तेव्हाच देश खऱ्या अर्थाने घडतो, असे प्रतिपादन प्रसिद्ध वक्ते सुहास हिरेमठ यांनी कर्मचारी प्रशिक्षण वर्गात केले.
महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असलेल्या 'अमृत' (महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी) च्या वतीने आयोजित पाच दिवसीय कर्मचारी प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन श्री हिरेमठ यांच्या हस्ते रविवारी झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. हे निवासी शिबिर अमृतच्या औंध (पुणे) येथील मुख्यालयात 14 जून ते 18 जून या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे.
पुढे बोलताना सुहासजी हिरेमठ म्हणाले की, "आपण कैक पटींनी पुण्यवान आहोत म्हणून आपला जन्म भारतात झाला. आपल्या देशातील प्रत्येक नागरिक सुशिक्षित होण्यासोबतच सुसंस्कृतही झाला पाहिजे. स्वार्थी आणि संकुचित वृत्तीचा त्याग करून सर्वांनी 'राष्ट्रप्रथम' या भावनेने कार्य करणे अपेक्षित आहे. यासाठी स्वदेशी, स्वभाषा, संस्कृती आणि बचत या गोष्टी अंगीकाराव्या लागतील. अमृतचे प्रतिनिधी म्हणून केवळ कर्मचारी न होता, 'कार्यकर्ता' या भावनेने काम केले तर व्यक्ती निर्माणातून राष्ट्रनिर्मिती होईल. कामातून माणूस जोडला जाणे महत्त्वाचे असून, आपल्याला मिळालेल्या कामाची उंची आणि खोली वाढवण्याचा प्रयत्न सर्वांनी केला पाहिजे," असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी 'अमृत' संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणातून संस्थेची सुरुवात आणि इथपर्यंतचा संघर्षमय प्रवास उपस्थितांसमोर उलगडला. अमृत संस्थेने केलेल्या प्रगतीची दखल आज राज्यभरातील अनेक संस्था घेत असल्याचा अभिमान त्यांनी व्यक्त केला. अशा प्रशिक्षण शिबिरांमधून कर्मचाऱ्यांनी नवीन उपक्रम, कौशल्ये आणि नाविन्यपूर्ण कल्पना शिकण्याची गरज असल्याचे सांगत, "यापुढे सर्वांनी अधिकाधिक जबाबदारीने आणि कार्यक्षमतेने कार्य करणे अपेक्षित आहे," असे आवाहन त्यांनी कर्मचाऱ्यांना केले.
कार्यक्रमाची सुरुवात अत्यंत उत्साहात 'भारतमाता पूजनाने' झाली. या पाच दिवसीय निवासी शिबिरासाठी राज्यातील सर्व 36 जिल्ह्यांमधून अमृत व्यवस्थापक, अमृत मित्र आणि अमृत सखी मोठ्या संख्येने उपस्थित होते.