दि. ३० :-
अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यातून एक अत्यंत दुर्दैवी वृत्त समोर आले आहे. मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरात पांढरी गावातील दोन व्यक्ती वाहून गेल्याची घटना काल रात्री १० वाजेच्या सुमारास घडली आहे.
वाहून गेलेल्या व्यक्तींची नावे: गोपाल निर्वार आणि रवींद्र आवारे (दोघेही राहणार पांढरी).
शिरसगाव ते पांढरी या मार्गावर 'चारगड' नावाचा नाला आहे. काल झालेल्या मुसळधार पावसामुळे या नाल्याला मोठा पूर आला होता. गोपाल आणि रवींद्र हे दोघे शिरसगाव कसबा येथून रात्री पायी आपल्या मूळ गावी म्हणजेच पांढरीकडे जात होते. रात्रीच्या अंधारात पाण्याचा अंदाज न आल्यामुळे, नाल्यावरील पूल ओलांडताना पाण्याचा जोरदार प्रवाह या दोघांना वाहून घेऊन गेला.
आज सकाळपासूनच पांढरी गावातील ग्रामस्थ या दोन्ही व्यक्तींचा शोध घेत आहेत.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अमरावती येथून एनडीआरएफ (NDRF) च्या टीमला पाचारण करण्यात आले आहे. सध्या या पथकाद्वारे परिसरात कसून शोधमोहीम राबवली जात आहे.
या घटनेमुळे संपूर्ण पांढरी गावासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, प्रशासनाकडून नागरिकांना पुराच्या पाण्यातून प्रवास न करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
0 Comments