उष्णतेच्या लाटेपासून कामगारांच्या संरक्षणासाठी प्रशासनाचे निर्देश; - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, May 1, 2026

उष्णतेच्या लाटेपासून कामगारांच्या संरक्षणासाठी प्रशासनाचे निर्देश;

 


कामाच्या वेळेत बदल करण्याचे आवाहन

अमरावती, दि. १ मे  (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): सध्या देशासह राज्यात उन्हाळ्याच्या तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे कामगार व मजूर वर्गाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. विशेषतः बांधकाम, औद्योगिक आणि खाण क्षेत्रातील कामगारांना उष्णतेमुळे आरोग्याच्या मोठ्या जोखमीचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर कामगारांचे आरोग्य व सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी अमरावतीचे सहायक कामगार आयुक्त अ. सु. पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व नियोक्ते, उद्योग आणि बांधकाम कंपन्यांना तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. यानुसार कामगारांच्या कामाच्या वेळेत आवश्यकतेनुसार बदल करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, दुपारच्या कडक उन्हाच्या काळात जड किंवा कठीण कामे टाळून ती दिवसाच्या थंड वेळेत नियोजित करण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

कामाच्या ठिकाणी पिण्याच्या स्वच्छ पाण्याची मुबलक उपलब्धता करून देणे तसेच कामगारांना सावली व विश्रांतीची सोय उपलब्ध करून देणे आता बंधनकारक असणार आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रत्येक आस्थापना स्तरावर आईस पॅक, प्राथमिक उपचार साहित्य आणि उष्णतेपासून बचावासाठी आवश्यक साधने सज्ज ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आरोग्य विभागाशी समन्वय साधून कामगारांची नियमित आरोग्य तपासणी करणे आणि कारखाने व खाण क्षेत्रात कामाचा वेग मर्यादित ठेवण्याबाबतही सूचित करण्यात आले आहे. अत्यंत उष्णतेच्या काळात विश्रांतीच्या वेळेत लवचिकता आणणे, आवश्यक असल्यास दोन कामगारांची टीम नेमणे आणि कामाच्या ठिकाणाजवळच विश्रांतीगृहांची सोय करण्यावर भर देण्यात आला आहे.

कामगारांना थंड पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्स उपलब्ध करून देण्यासोबतच, उष्णतेचे धोके व त्यावरील प्रतिबंधात्मक उपायांबाबत कामगारांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी कामगार नाका व सार्वजनिक ठिकाणी पोस्टर्स, बॅनर्स लावून जनजागृती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या सर्व उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आणि नियमित निरीक्षणासाठी स्वतंत्र यंत्रणा तयार करण्यात यावी. सर्व नियोक्त्यांनी याकडे वैयक्तिक लक्ष देऊन कामगारांची सुरक्षा सुनिश्चित करावी, असे आवाहन कामगार विभागामार्फत करण्यात आले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages