"४५° तापमानात झाडावर कुऱ्हाडीचे वार; चांदूर बाजारात संतापाची लाट!" - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Tuesday, May 19, 2026

"४५° तापमानात झाडावर कुऱ्हाडीचे वार; चांदूर बाजारात संतापाची लाट!"


 दि. २०  
चांदूर बाजार :-

अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार येथील वृंदावन कॉलनीमध्ये कडक उन्हाळ्यात भररस्त्यावरील हिरवेगार झाड कुऱ्हाडीने तोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अमानुष कृत्य करणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट पसरली आहे.

४५° सेल्सिअस तापमानात संतापजनक प्रकार
सध्या संपूर्ण विदर्भासह चांदूर बाजार परिसरात उन्हाचा पारा ४५° सेल्सिअसच्या पार गेला आहे. नागरिक उन्हाच्या तीव्र झळांनी त्रस्त असताना आणि सावलीसाठी आसरा शोधत असताना, वृंदावन कॉलनीमध्ये एका व्यक्तीने रस्त्या कडेला असलेल्या एका मोठ्या झाडावर थेट कुऱ्हाडीने सपासप वार करून ते तोडण्यास सुरुवात केली.
झाड तोडणाऱ्या संबंधित व्यक्तीला नागरिकांनी जाब विचारला असता, त्याने अत्यंत धक्कादायक कारण दिले. आपल्या 'एक्वा-कूल' (Aqua-Cool) पाण्याच्या व्यवसायात आणि गाडीच्या वाहतुकीत अडथळा निर्माण होत असल्यामुळे हे झाड कापल्याची कबुली त्याने दिली. स्वतःच्या व्यावसायिक स्वार्थासाठी एका मोठ्या झाडाचा बळी घेण्याच्या या कृत्यामुळे परिसरातील पर्यावरणप्रेमी कमालीचे संतप्त झाले आहेत.
व्हिडिओ व्हायरल; गुन्हा दाखल करण्याची मागणी
झाड तोडत असतानाचा हा संपूर्ण प्रकार स्थानिक नागरिकांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर स्थानिक प्रशासनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. 'झाडे लावा, झाडे जगवा' अशी मोहीम एकीकडे शासन आणि सामाजिक संस्था राबवत असताना, दुसरीकडे अशा प्रकारे दिवसाढवळ्या होणाऱ्या वृक्षतोडीमुळे संताप व्यक्त होत आहे.
कठोर कारवाईची मागणी
वृक्षप्रेमी आणि स्थानिकांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून, झाड तोडणाऱ्या संबंधित व्यक्तीवर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नगर परिषद आणि वन विभागाकडे केली आहे.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages