"चांदूर बाजार: एसटीच्या २ रुपये नव्या नियमामुळे वाहक आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये वाद" - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Tuesday, May 19, 2026

"चांदूर बाजार: एसटीच्या २ रुपये नव्या नियमामुळे वाहक आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये वाद"

 


दि. २० चांदूरबाजार :-

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (MSRTC) बस आणि बसस्थानकांच्या स्वच्छतेचा दर्जा सुधारण्यासाठी प्रत्येक तिकिटामागे २ रुपये अधिभार (Surcharge) लागू केला आहे. शासनाकडून ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना 'अमृत ज्येष्ठ नागरिक' योजनेअंतर्गत एसटी प्रवास पूर्णपणे मोफत असतानाही, आता या नव्या नियमामुळे प्रत्येकाला २ रुपये मोजावे लागत आहेत. यावरून चांदूर बाजार परिसरात ज्येष्ठ नागरिकांनी संताप व्यक्त केला असून "एसटीत मोफत प्रवास आहे, तर मग दोन रुपये कसे घेता?" असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे.

१५ एप्रिलपासून नवीन नियम लागू
एसटी महामंडळाने १५ एप्रिलपासून राज्यातील सर्वच प्रकारच्या प्रवाशांसाठी हा 'स्वच्छता प्रवास' अधिभार लागू केला आहे. हा नियम केवळ पूर्ण तिकीट काढणाऱ्या प्रवाशांसाठीच नाही, तर शासनाच्या विविध सवलतींचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांनाही बंधनकारक करण्यात आला आहे. यामध्ये खालील घटकांचा समावेश आहे:
अमृत ज्येष्ठ नागरिक: ७५ वर्षांवरील नागरिकांना मिळणारी १००% मोफत प्रवास सवलत.
महिला सन्मान योजना: महिलांना मिळणारी ५०% तिकीट सवलत.
इतर सर्व सवलतधारक: महामंडळाच्या इतर सर्व योजनांचे लाभार्थी.
सुट्या पैशांवरून वाहक आणि प्रवाशांमध्ये वाद
प्रवास पूर्णपणे मोफत आहे असे समजून अनेक ज्येष्ठ नागरिक बसमध्ये चढतात. मात्र, वाहकाने (Conductor) २ रुपयांची मागणी केल्यावर अनेक प्रवाशांना धक्का बसत आहे. या नवीन नियमाची पुरेशी माहिती नसल्यामुळे अनेक बसमध्ये वाहक आणि प्रवाशांमधे सातत्याने वादाचे प्रसंग घडत आहेत. त्यातच दोन रुपयांच्या सुट्या पैशांवरूनही मोठी अडचण निर्माण होत आहे.
ज्येष्ठ नागरिकांची संतप्त प्रतिक्रिया
चांदूर बाजार ते परतवाडा मार्गावर प्रवास करणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाने आपली व्यथा मांडताना सांगितले की, "शासनाने ७५ वर्षांनंतर आम्हाला सन्मानाने मोफत प्रवासाची सोय दिली आहे. मात्र, आता हे दोन रुपये नेमके कशासाठी घेतले जात आहेत? आज दोन रुपये अधिभार लावला आहे, उद्या अर्धे तिकीट तर करणार नाही ना?" सामान्य ज्येष्ठ नागरिकांना दोन रुपयांचे सुटे शोधताना आणि वाहकांशी वाद घालताना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
सूट देण्याची मागणी
एसटी प्रशासनाने बस स्थानक आणि गाड्या स्वच्छ ठेवण्यासाठी पाऊल उचलले असले, तरी त्याचा भुर्दंड मोफत आणि सवलत दरात प्रवास करणाऱ्यांवर का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि सवलतधारकांना या २ रुपयांच्या अधिभारातून तात्काळ सूट देण्यात यावी, अशी मागणी चांदूर बाजार परिसरातील नागरिकांनी केली आहे.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages