अमरावती, दि.२६ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): भारतीय डाक खात्याच्या वतीने अमरावती विभागातील ग्राहकांच्या प्रलंबित तक्रारींचे निवारण करण्यासाठी सोमवार, दि. 2 जून रोजी सकाळी 11 वाजता प्रवर अधीक्षक डाकघर कार्यालयात 'डाक अदालत' आयोजित करण्यात आले आहे.
या डाक अदालतीमध्ये प्रामुख्याने स्पीड पोस्ट, नोंदणीकृत पार्सल, काऊंटर सेवा, बचत बँक खाते आणि मनीऑर्डर यांसारख्या सेवांशी संबंधित तक्रारी विचारात घेतल्या जातील. विशेषतः अशा तक्रारी, ज्यांचे निवारण सहा आठवड्यांच्या आत झाले नसेल किंवा ज्यांना विभागाकडून समाधानकारक उत्तर मिळाले नसेल, अशा प्रकरणांची दखल येथे घेतली जाणार आहे.
तक्रारदारांनी आपला अर्ज सादर करताना त्यामध्ये मूळ तक्रार केल्याची तारीख, संबंधित अधिकाऱ्याचे नाव व पद, आणि तक्रारीचा संपूर्ण तपशील नमूद करणे आवश्यक आहे. हे अर्ज 'प्रवर अधीक्षक डाकघर, अमरावती विभाग, अमरावती - 444602' यांच्या नावे पाठवावेत. सर्व संबंधित अर्ज 1 जूनपूर्वी कार्यालयात पोहोचणे अनिवार्य आहे, असे प्रवर अधीक्षक डाकघर यांनी कळविले आहे.