राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातून ८७९ बालकांना नवसंजीवनी - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, May 28, 2026

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातून ८७९ बालकांना नवसंजीवनी




 अमरावती जिल्ह्यात आरबीएसके योजनेचा प्रेरणादायी प्रवास

अमरावती, दि. २९ : राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाशजी आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली अमरावती जिल्ह्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (आरबीएसके) प्रभावीपणे राबविण्यात येत असून, हा उपक्रम हजारो बालकांसाठी जीवनदायी ठरत आहे. शासनाची ही योजना केवळ आरोग्य सेवा न राहता अनेक कुटुंबांसाठी आशेचा किरण बनली आहे. या योजनेअंतर्गत गंभीर आजारांनी ग्रस्त बालकांना मोफत शस्त्रक्रिया करून नवजीवन देण्यात आले आहे. या योजनेतून मागील काही वर्षांत तब्बल ८७९ हृदय शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आल्या असून, अनेक बालकांना मृत्यूच्या दारातून परत आणण्यात यश आले आहे. याशिवाय ४५४७ इतर विविध शस्त्रक्रिया करून हजारो कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेष बाब म्हणजे या सर्व उपचारांसाठी पालकांना कोणताही आर्थिक खर्च करावा लागलेला नाही, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विनोद पवार यांनी दिली आहे.

आरबीएसके कार्यक्रमांतर्गत अंगणवाडीपासून शाळास्तरापर्यंत बालकांचे १०० टक्के आरोग्य तपासणी (स्क्रिनिंग) करण्यात येत असून, विविध आजारांचे वेळेत निदान करून तातडीने उपचार उपलब्ध करून दिले जात आहेत. दुर्गम आणि ग्रामीण भागातील बालकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्यात अमरावती जिल्ह्याने उल्लेखनीय यश मिळविले आहे.

            आरबीएसके अंतर्गत जन्मजात हृदय रोग, जन्मजात नेत्र रोग, कर्णदोष, दुभंगलेले ओठ व टाळू, हर्निया, हायड्रोसील, स्क्विंट (डोळ्यांचा तिरळेपणा), दंतरोग, फायमोसीस, हाडांचे आजार तसेच टॉन्सिल्स आदी विविध आजारांवर उपचार करण्यात येत आहेत. या शस्त्रक्रियांसाठी विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय अमरावती, डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय, डॉ. पाटील कान-नाक-घसा हॉस्पीटल, आचार्य विनोबा भावे रुग्णालय सावंगी, कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटल मुंबई, एसआयसीसी चिल्ड्रन हॉस्पिटल मुंबई, नेल्सन हॉस्पिटल नागपूर, किम्सवे हॉस्पिटल नागपूर, स्वास्तम हॉस्पीटल नागपूर, संजीवनी हॉस्पीटल मुंबई आदी नामांकित रुग्णालयांचे सहकार्य लाभत आहे.

            जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विनोद पवार यांनी सांगितले की, “आरोग्यमंत्री प्रकाशजी आबिटकर यांच्या सूचनेनुसार ही योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून प्रत्येक बालकाला योग्य उपचार मिळावेत, हे आमचे प्रमुख ध्येय आहे.”

            निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य संपर्क) डॉ. संदीप हेडाऊ यांनी सांगितले की, “टीमवर्क, वेळेवर रेफरल आणि सातत्यपूर्ण फॉलोअप यामुळेच आम्हाला शंभर टक्के यश मिळाले आहे. भविष्यातही अधिकाधिक बालकांपर्यंत ही सेवा पोहोचविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

            जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक श्री निलेश पुंनसे यांनी अमरावती जिल्ह्यातील दुर्धर आजारांनी ग्रस्त बालकांच्या पालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. तालुकास्तरावर कार्यरत पथकांमार्फत मोफत सेवा उपलब्ध करून दिली जात असून, ही सेवा भविष्यातही अविरत सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

            अमरावती जिल्ह्यातील आरबीएसके योजनेचा हा प्रवास केवळ आकडेवारीपुरता मर्यादित नसून, हजारो बालकांच्या नव्या आयुष्याचा आणि त्यांच्या पालकांच्या आनंदाश्रूंचा साक्षीदार ठरत आहे.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages