नागरी सेवा दिन आणि राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान’
सर्वोत्कृष्ट कल्पना/उपक्रमांतर्गत विभागीय आयुक्त कार्यालयास राज्यस्तरीय पुरस्कार
* मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबईत सत्कार व पुरस्कार वितरण
* अमरावती महापालिकेच्या ‘कूल रुफ’ संकल्पनेला राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार
अमरावती, दि. 25 : राज्य शासनाच्या राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियानात सर्वोत्कृष्ट कल्पना/उपक्रमांर्तगत ‘बिंदू नामावली सॉफ्टवेअर’ विकसित केल्यासाठी तृतीय पुरस्कार विभागीय आयुक्त कार्यालयातील मागासवर्ग कक्षाच्या सहाय्यक आयुक्त वैशाली पाथरे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई येथे मंगळवारी (ता. 21 एप्रिल) प्रदान करण्यात आला.
नागरी सेवा दिन 2026 आणि ‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा 2025-26’ अंतर्गत पारितोषिक वितरण सोहळा 21 एप्रिल रोजी, मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृह येथे झाला. कौशल्य, रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव पंकजकुमार तसेच पुरस्कारार्थी यावेळी उपस्थित होते. श्रीमती पाथरे यांच्यासह मागासवर्ग कक्षाचे सहा.महसूल अधिकारी सुजन सोळंके, दत्तात्रय हातेकर यांनी सदर पुरस्कार स्विकारला.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या मागासवर्ग कक्षाव्दारे विकसित करण्यात आलेल्या ‘बिंदू नामावली सॉफ्टवेअर’ मुळे रोस्टर्स तयार करण्याची प्रक्रिया सुलभ झाली आहे. यामुळे शासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्थामधील कर्मचाऱ्यांची आरक्षणनिहाय अचूक माहिती तयार होत असून 100 बिंदूनामावली नोंदवही संगणीकृत पध्दतीने संबंधित कार्यालयास उपलब्ध होते. या सॉफ्टवेअरमध्ये कार्यालयाच्या आस्थापनेवर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती प्रर्वगानुसार सर्व माहिती विहित नमून्यात नोंदविली जाते. तसेच यात नियुक्ती प्रर्वगाचे आदेश, जात वैधता प्रमाणपत्र आदी आवश्यक दस्तावेज अपलोड करण्याची सुविधा दिली असल्यामुळे अचूक डेटा तयार होतो.
प्रत्येक भरती वर्षात बिंदूनामावली अद्ययावत करावयाची असल्यामुळे पुन्हा पुन्हा सर्व कर्मचाऱ्यांची माहिती गोळा करणे व नोंदवहीत लिहून काढण्याची आवश्यकता राहत नाही. बिंदुनामावलीत बिंदूच्या क्रमानुसार 1 बिंदू क्रमांक नोंद झाल्यानंतर लगेच दुसरा बिंदू कार्यरत होतो, त्यामुळे बिंदूचा क्रम चुकत नाही. या ‘बिंदू नामावली सॉफ्टवेअर’ मुळे अमरावती विभागातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्थामध्ये नोकरभरती व पदोन्नती, अनुकंपाची प्रकरणे लवकर मार्गी लागण्यासाठी सुविधा उपलब्ध झाली आहे.
अमरावती महापालिकेच्या ‘कूल रुफ’ संकल्पनेला राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार
महानगरपालिका स्तरावरून थेट प्रस्तावअंतर्गत ‘कूल रुफ’करिता तत्कालिन आयुक्त सौम्या शर्मा आणि अमरावती मनपा आयुक्त वर्षा लढ्ढा यांना प्रथम पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला.
शहरातील नागरिकांचे घर, व्यापारी संकुल, छोटे-मोठे व्यवसायांचे गाळे यावर उन्हाळ्यातील तापमान कमी करण्याच्या उद्देशाने कूल रुफ बसविण्याचा उपक्रम महापालिकाकडून राबविण्यात आला असून यास उर्त्स्फूत प्रतिसादही मिळाला. या उपक्रमांतर्गत घराच्या किंवा दुकानांच्या छतावर तापमान कमी करण्याचे दृष्टीने सोलर यंत्रणा बसविने, उन्हाची तीव्रता कमी करणारे कलर लावणे तसेच मोझॅक स्टाईल्स लावणे आदी बाबींचा समावेश आहे.
Post a Comment
0 Comments